मंगळागौरीच्या मंचावर संस्कृतीचा जागर; रांधे गावचा ‘स्वामीकृपा महिला संघ’ ठरला आदर्श स्पर्धक

मंगळागौरी

अहिल्यानगर (सहसंपादक प्रविण वराळ) | शारदीय नवरात्रोत्सवाच्या औचित्याने श्री स्वामी समर्थ देवस्थान, रांधे (ता. पारनेर) येथे आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर सोहळा भक्तिमय आणि अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष असून, पारंपरिक संस्कृतीचा जागर, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि हजारो भाविकांची उपस्थिती हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. या स्पर्धेत रांधे येथील ‘स्वामीकृपा महिला संघ’ आणि निघोज येथील ‘हिरकणी महिला समूह’ यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.

 

दरम्यान, स्वामीकृपा महिला संघाने मिळवलेल्या बक्षिसाची संपूर्ण रक्कम देवस्थानच्या महाप्रसाद सेवेसाठी अर्पण करून सामाजिक बांधिलकी व निस्सीम सेवाभावाचा आदर्श निर्माण केला.

या सोहळ्याचे उद्घाटन ह. भ. प. अनेष महाराज आवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. स्पर्धेसाठी मुंबई, पुण्यासह विविध भागांतील तब्बल १८ संघांनी नोंदणी केली होती. नियमांची पूर्तता करणाऱ्या संघांमध्ये पारंपरिक गाणी, नृत्यकौशल्य आणि सांघिक एकजुटीची जोरदार चुरस पाहायला मिळाली. उपस्थितांनी आणि भाविकांनी कलागुणांचे कौतुक करत स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षाव केला.

प्रथम क्रमांकाचा मान पटकवल्यानंतर स्वामीकृपा महिला संघातील सोनल आवारी, वर्षा भोसले, छाया पावडे, संजना म्हस्के, ऐश्वर्या बेलकर, सेजल मुळे, पूनम दवे, आश्विनी वरखडे व सोनल खामकर यांनी एकमताने एक कौतुकास्पद निर्णय घेतला. त्यांना मिळालेली संपूर्ण बक्षीस रक्कम आणि भाविकांकडून मिळालेली रोख पारितोषिके त्यांनी श्री स्वामी समर्थ देवस्थान येथील महाप्रसाद सेवा व स्वामींच्या पादुकांसाठी अर्पण केली. त्यांच्या या दातृत्वाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

या स्पर्धेत निघोज येथील ‘हिरकणी महिला समूहा’च्या आशा चौधरी, अमृता भाकरे, प्रियंका घनवट, रुचिता भोजने, सनीशा घोगरे, राखी गजरे, वर्षा पोटे, मंदा भुकन, मालती भाकरे व अश्विनी भाकरे यांनी आपल्या अप्रतिम कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना प्रथम क्रमांक विभागून देऊन सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यासाठी डॉ. भास्कर शिरोळे, उद्योजक भास्कर जाधव, भाजप कार्यकारिणी सदस्य विश्वनाथदादा कोरडे, सचिनभाऊ वराळ, भास्कर उचाळे सर, कांचनताई म्हस्के, रत्नमाला शेटे यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. परीक्षक म्हणून योगेश जोरी, कानिफनाथ फुलमाळी आणि युवराज झिंजाड यांनी काम पाहिले.

श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या सर्व सेवेकऱ्यांनी ‘मी’ नव्हे तर ‘आम्ही’ या भावनेने आणि निस्वार्थ वृत्तीने श्रमदान करून हा सोहळा यशस्वी केला. मंगळागौरीच्या माध्यमातून परंपरेचे जतन करणारा आणि भक्तीचा प्रत्यय देणारा हा सोहळा परिसराच्या सांस्कृतिक वाटचालीतील एक संस्मरणीय पर्व ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here