
पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले यांनी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भेट देऊन वारकरी भाविकांसाठी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणीताताई भगीरथ भालके उपस्थित होत्या.
मंत्री महोदयांनी वाळवंट परिसर, ६५ एकर येथील वारकरी निवास व व्यवस्था तसेच आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. कार्तिकी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्यांना स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रणीताताई भालके यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून यात्रेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाची व सुविधांची माहिती मंत्रिमहोदयांना दिली. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी केलेले नियोजन, विविध विभागांमध्ये साधलेला समन्वय आणि प्रत्यक्ष व्यवस्थेवर ठेवलेले लक्ष याबद्दल मंत्री भरतशेठ गोगावले यांनी नगराध्यक्षा प्रणीताताई भालके यांच्या कामाचे कौतुक केले.
पाहणीदरम्यान मंत्री महोदयांनी वारकरी भाविकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच भजन-कीर्तनामध्ये सहभागी होत भक्तिरसात तल्लीन झाले. पंढरीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला उत्तम सुविधा मिळाव्यात आणि विठुरायाचे दर्शन घेऊन जाताना त्याच्या मनात समाधानाची भावना असावी, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी सांगितले.







