मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून २ लाखांचा धनादेश सुपूर्द

राजूमामा भोळे

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | महाराष्ट्र राज्यात दुष्काळाची परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सामाजिक बांधिलकीपोटी, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश आज, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला.

 

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर गंभीर आर्थिक व सामाजिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा कठीण प्रसंगी शासनाच्या विविध मदत योजनांसोबतच समाजातील सक्षम घटकांनीही आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे, या भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हा निधी देण्यात आला आहे.

या प्रसंगी बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, “दुष्काळ ही केवळ शासनाची जबाबदारी नसून अशा बिकट काळात समाजातील प्रत्येक सक्षम घटकाने आपली सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेली मदत एखाद्या गरजू कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते.”

तसेच जळगावसह महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, दानशूर नागरिक, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच विविध क्षेत्रातील सक्षम व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या क्षमतेनुसार सढळ हाताने योगदान देऊन या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. “आज आपण दिलेला मदतीचा हात उद्या एखाद्या कुटुंबाला संकटातून सावरण्याचे बळ देऊ शकतो. दुष्काळाच्या या काळात ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ या भावनेतून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे,” असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना तीव्रतेने राबविण्यात येत आहेत. यामध्ये समाजातील दानशूर व सक्षम घटकांनीही आपापल्या परीने हातभार लावल्यास मदतीचा हा प्रयत्न अधिक व्यापक व प्रभावी होऊ शकतो. संकटाच्या काळात ‘शासनाची साथ आणि समाजाचा हात’ एकत्र आल्यास राज्यातील अनेक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here