कापूस, मका, ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करा; तालुका शिवसेनेची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

shindkheda-shivsena

शिंदखेडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील कापूस, मका, ज्वारी हमीभाव खरेदी केंद्रे बंद असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी शासनाने कापूस, मका, ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. बदली होऊन शिंदखेडा तहसीलदार पदाचा कार्यभार सुनिल सैंदाणे यांनी हाती घेतल्याचा पहिल्याच दिवशी तालुका शिवसेनेतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले की, शिंदखेडा तालुक्यात मागील हंगामात सी.सी.आय मार्फत कापुस खरेदी केंद्र व केंद्र शासनातर्फे मका, ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. सदरील खरेदी केंद्र हे बंद झाले असून चालू हंगामात शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापुस, मका, ज्वारी लागवड झाली असून सद्य परिस्थितीत कोविड परिस्थितीमुळे कापूस सरासरी तीन हजार पाचशे प्रती क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. तसेच मका व ज्वारी आठशे ते एक हजार रुपये प्रती क्विंटल पर्यत विक्री होत आहे.

 

गेल्या मार्च महिन्यापासून कोविड परिस्थितीमुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. मागील वर्षी कापूस व मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरु असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु चालु वर्षाचा खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांनी कापूस वेचणी, मका, ज्वारी, बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक तंगीमुळे शेतकरी वर्ग सदर पिके मिळेल त्या भावाने विक्री करीत आहे. shindikheda-sivsena1

 

शेतकऱ्यांना आलेला उत्पादन खर्च बघता सदरील पिके विक्री केल्यानंतर मोठे नुकसान होत आहे. म्हणून केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ताबडतोब कापूस, मका, ज्वारी, हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, असे निवेदनात शेवटी नमुद केले आहे.

 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, शिंदखेडा कृ.उ.बा.स.संचालक सर्जेराव पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, उपतालुकाप्रमुख संतोष देसले, शहरप्रमुख सागर देसले, हातनूरचे उपसरपंच दिपक जगताप, गणेश परदेशी, प्रदीप पवार, सुकदेव बागुल, ॲड.वसंतराव पाटील, माजी उपसभापती रमेश पाटील, शिरपूर शिवसेनेचे दिपक चोरमले, विभाभाई जोगराणा, मनोज धनगर, अत्तरसिंग पावरा आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here