पुणे (उपसंपादक मनीष नेरुरकर) – मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने 10 दुचाकी व 8 चारचाकी वाहनांना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार 4 जणांचा मृत्यु झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावरुन देहुरोडच्या दिशेने एक ट्रक भरधाव चालला होता. त्याचवेळी ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या 8 ते 10 दुचाकींना उडविले, तरीही ट्रक थांबला नाही, त्यापुढेही वेगात जाणाऱ्या ट्रकने 8 ते 9 चारचाकी वाहनांना ही उडविले.
दरम्यान, घटना घडल्यानंतर काही मिनिटातच भारती विद्यापीठ पोलिस व वाहतूक शाखेचे पोलिस, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना मिळेल त्या वाहनामधून तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविले. त्याचबरोबर मृतदेह रुग्णवाहीकेतुन रुग्णालयात पोचविण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडुन अपघातातील मृत व्यक्ती व जखमी नागरीकांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच वाहतूक शाखेकडुन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत महामार्गवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
अंगावर थरकाप उडविणाऱ्या या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. रस्त्याने जाणारे नागरिक आपला जीव वाचविण्यात धावू लागले, तर वाहनामधील नागरिकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, तर किती जण जखमी झालेत, याची अद्याप मोजदाद झालेली नाही. या विचित्र व भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरीकांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरुन सोडला.







