दौंड (प्रतिनिधी विकास साळुंखे) | मौजे नाथाचीवाडी (ता. दौंड) हद्दीतील माटोबा तलाव परिसरातून २० शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल्स चोरी करणाऱ्या सराईत चोराला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दाखल गुन्ह्यांमधील १०० टक्के चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजे दरम्यान माटोबा तलाव परिसरातून शेतकऱ्यांच्या मोटारपंपावरील तांब्याच्या केबल्स चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एकूण ३ गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास पथक तयार करत सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे शोध सुरू केला.
तपासादरम्यान, सदर चोरी मनोज गुलाब बिंद (वय ३७, सध्या रा. मांजरी फार्म, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याने केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबल्स आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोहवा संदिप देवकर, रॉकी देवकाते, महेंद्र चांदणे आणि पोलीस अंमलदार धिरज जाधव, मारूती बाराते, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, सचिन गुंड, दिनेश लोणकर व विनित कुऱ्हाडे यांच्या पथकाने पार पाडली आहे.







