– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)
भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबर वाढदिवस.
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील एंग्री यंग मॅन अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.
अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.
हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले. बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला.
अमिताभ यांची कारकिर्द सुरु झाली ती व्हाइस नॅरेटर म्हणून भुवन शोम या चित्रपटापासून मात्र अभिनेता म्हणून त्यांना पहिला चित्रपट मिळाला सात हिंदुस्थानी. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले पण यश हाती आले नाही. मात्र त्यांच्या करिअरला टर्निंग पॉईंट देणारा चित्रपट म्हणजे जंजीर. या नंतर मात्र अमिताभ यांनी मागे वळून पाहिले नाही. अॅग्री यंग मॅनची जादू अशी काही चालली की, आनंद, अभिमान, सौदागर, चुपके चुपके, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकब अंथनी, त्रिशूल, डॉन, मुकद्दर का सिकंदर, मि.नटवरलाल, लावारिस, सिलसिला, कालिया, सत्ते पे सत्ता, नमक हलाल, शक्ती, कुली, शराबी, मर्द, शहंनशाह, अग्निपथ, खुदागवाह, मोहब्बते, बागवान, ब्लॅक, वक्त, सरकार, चीन कम, भूतनाथ, पा, सत्याग्रह, शमिताभ, पींक, वजीर यासारख्या अनेक चित्रपटांनी त्यांना या शतकाचे महानायक बनवले.
70 आणि 80 च्या दशकात चित्रपटसृष्टीवर अंग्री यंग मॅन अमिताभ यांचेच गारुड होते. त्यामुळे फ्रेंच डायरेक्टर फ्रॉस्वा त्रुफोने त्यांना ‘वन मॅन इंडस्ट्री’ म्हणून नावाजले होते. आजवरच्या आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासात अमिताभ यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यात प्रामुख्याने 3 राष्ट्रीय पुरस्कार, 14 वेळा फिल्मफेअर आणि आजवर सर्वाधिक म्हणजे 39 वेळा फिल्मफेअर नामांकन मिळालेले ते एकमेव अभिनेते आहेत.1984 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री व 2015 मध्ये पद्मविभूषण सन्मान त्यांना मिळाला आहे.
26 जुलै 1982 ला अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील मोठा अपघात घडला. कुलीच्या शुटींगदरम्यान त्यांना पोटावर गंभीर इजा झाली. पण फॅन्सच्या बळावर हा महानायक मृत्यूच्या द्वारातून परत आला. यानंतर मात्र त्यांना चित्रपट करता येणार नाही असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी राजनितीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि इलाहाबादमधून खासदारकीसाठी लढून उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एच.एन.बहुगुणा यांना प्रचंड बहुमताने हरवले. पण काही काळानंतर त्यांना राजकीय वातावरणाचा वीट आला आणि पुन्हा चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. शहंनशाह सुपरहिट झाली. अग्निपथने राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण चित्रपट कारकिर्द काहीशी उतरणीला लागली. त्याचदरम्यान त्यांनी एबीसीएल नावाने चित्रपट निर्मिती कंपनी स्थापन केली. पण बोटावर मोजण्याएवढे हिट चित्रपट दिल्यानंतर ही कंपनी आर्थिक संकटात सापडली. त्यावेळी त्यांचे मित्र राजकीय नेते अमरसिंह यांनी त्यांची मदत केली. याची परतफेड म्हणून अमिताभ यांनीही समाजवादी पार्टीला अनेक कारणांनी सपोर्ट केले. पत्नी जया बच्चन समाजवादी पार्टीकडून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या.
चित्रपटसृष्टीतील बदलता ट्रेण्ड लक्षात घेऊन आपल्या वयानुसार 2000 मध्ये अमिताभ यांनी मोहब्बते या चित्रपटात भूमिका स्वीकारली आणि प्रेक्षकांनी महानायकाचे हे नवे रुप डोक्यावर घेतले. 2005 मध्ये आलेल्या ब्लॅक या चित्रपटाने तर महानायकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर आलेल्या पा चित्रपटातून तर त्यांनी आपला मुलगा अभिषेक बच्चन याच्या मुलाची भूमिका केली. या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बर्याच कालावधीपासून अमिताभ गुजरात पर्यटनाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. टी.व्ही.वरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने आजवरच्या टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
मादाम तुसा यांच्या संग्रहालयात आशियातील पहिला नागरिक म्हणून अमिताभ यांचा जून 2000 मध्ये पुतळा तयार करण्यात आला. आजवर अमिताभ यांच्यावर अनेक पुस्तके आली आहेत. त्यातील महत्वाचे म्हणजे 1999 मध्ये अमिताभ बच्चन ः द लिजेंड, 2004 मध्ये टू बी ऑर नॉट टू बी ः अमिताभ बच्चन, 2006 मध्ये एबी ः द लिजेंड (ए फोटोग्राफर्स ट्रिब्यूट), 2006 मध्येच अमिताभ बच्चन ः एक जिवित किंवदंती, अमिताभ ः द मेकिंग ऑफ ए सुपरस्टार, 2007 मध्ये लुकिंग फॉर द बिग बी ः बॉलिवूड बच्चन अॅण्ड मी आणि 2009 मध्ये बच्चनालिया या पुस्तकांचा समावेश आहे. अमिताभ पूर्णतः शाकाहारी असून, त्यांना हॉटेस्ट वेजिटेरियन म्हणून 2012 मध्ये पेटा इंडिया या संस्थेने गौरविले आहे.
अमिताभ नेहमीच काळाची पावले ओळखून चालणारे व्यक्तिमत्व आहे. आजचा काळ हा सोशल मिडीयाचा काळ आहे. काळानुसार त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवर आपले अकाऊंट उघडले असून, करोंडोनी फॅन्स त्यांचे फॉलोवर आहेत. आपल्या फॅन्सला ते कधीही निराश करत नाहीत, नियमितपणे ते या माध्यमातून व्यक्त होत असतात.







