पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कॅम्प परिसरात कबाब पावची गाडी लावणाऱ्या तरुणाचा धारधार हत्याराने वार करून खून करण्यात आला. उबेद बाबू कुरेशी (वय-28, रा. भीमपूरा गल्ली न 23, कॅम्प) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान, बाबाजान दर्गा एज्युकेशन शाळेच्या समोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, नबील शब्बीर बेलीम असे त्याचे नाव आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उबेद कुरेशी हा बाबाजान दर्गा एज्युकेशन शाळेच्या समोर कबाब पावची गाडी लावतो. ताब्यात घेतलेला संशयित व्यक्ती हे दोघे एकमेकांचे परिचयाचे आहेत. दरम्यान उबेद हा नेहमी नबीलला शिवीगाळ करत असे. त्यातूनच त्यांच्यात चेष्टा-मस्करी सुरू असताना संशयित आरोपीने चाकू उबेदच्या छातीमध्ये मारला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत, संशयित व्यक्ती नबीलला ताब्यात घेतले. उबेदचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलिस करत आहेत. नाबील हा चाकूने वार करताना नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.







