‘इसिस’च्या 15 दहशतवाद्यांना कठोर तुरुंगवास

issi

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत 2015 मध्ये ‘इसिस’ या जहाल दहशतवादी संघटनेसाठी कट रचल्याप्रकरणी 15 दहशतवाद्यांना विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी कठोर तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली.

 

 

 


भारतात ‘इसिस’ची शाखा उघडणे आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करत मुस्लिम युवकांची बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेत भरती केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) एका प्रवक्त्याने सांगितले की, देशभरातील शोधमोहिमेत 19 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भारतात खलिफा स्थापन करण्यासाठी जुनूद-उल-खलिफा-फिल-हिंद नावाचा नवीन गट स्थापन केल्याचा आणि ‘इसिस’वर निष्ठा ठेवत त्यांच्या कामासाठी मुस्लिम युवकांची भरती केल्याचा तसेच भारतात दहशतवादी कृत्य केल्याचा आरोप आहे.

 

 

 


या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर ‘इसिस’चे जाळे पसरविण्याच्या आणि दहशतवादी कृत्ये रोखण्यात यश मिळाले होते. अनेक युवक ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी मध्य पूर्व देशांमध्ये पोहोचल्याचे समोर आले होते. त्यानंतर यातील अनेकांना पकडून परत भारतात आणण्यात आले होते, असेही या प्रवक्त्याने सांगितले. ‘एनआयए’ने 2017 मध्ये 16 संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

 

 

 


15 आरोपींना एनआयए न्यायालयाने वेगवेगळी शिक्षा ठोठावली. यातील नफीस खानला 10 वर्षे कठोर तुरुंगवास आणि 1.03 लाख रुपयांचा दंड, अशी सर्वात मोठी शिक्षा सुनावली. अन्य तीनजणांना सात वर्षे कठोर तुरुंगवास आणि दंड, दोघांना सहा वर्षे तुरुंगवास आणि नऊजणांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच 38 हजार रुपयांपासून 65 हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींना प्रत्येकी 38 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here