औरंगाबाद (प्रतिनिधी) – लॉकडाऊनपूर्वी व्यावसायिकाला २ लाख रूपये उसने दिले होते. ते परत न दिल्याने घरासमोरून त्याचे अपहरण करणाऱ्या टोळीतील दोघांना जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले. शेख नय्यर शेख हुसेन (रा. किराडपुरा), मुजफ्फर अन्वर खान (रा. करीम कॉलनी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास मोहम्मद रियाज मोहम्मद रऊफ (रा. संजयनगर) यांच्या घरी येऊन नासेर आणि एक अनोळखी व्यक्तीसह दोन महिलांनी पैसे का देत नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर चौघांनी रियाज यांचे अपहरण केले होते. या प्रकरणात मोहम्मद रियाज यांच्या पत्नीने जिन्सी पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक दत्ता शेळके यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करण्यासाठी विशेष पथकही स्थापन करण्यात आले होते. या पथकाला मिळालेल्या माहितीवरून आरोपी हे आंबेडकर नगरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. तिथे शोध घेतला असता, सहारा गॅरेज येथे व्यावसायिकाला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली.
पोलीस या गॅरेजमध्ये गेले. तेथून दोघांना ताब्यात घेतले. तसेच मोहम्मद रियाज याची सुटका केली. ही कारवाई जिन्सी पेालीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, पेालीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, पोलीस हवालदार हारूण शेख, पोलिस कर्मचारी संजय गावंडे, सुनील जाधव, संतोष बमनात यांनी केली. या प्रकरणातील दोन आरोपी महिलांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती जिन्सी पोलिसांनी दिली.







