नाशिक (विशेष प्रतिनिधी) – मद्यपानास विरोध केल्याच्या रागातून मद्यपान करणाऱ्यांनी पेव्हर ब्लॉकने हल्ला करीत दोघांची डोकी फोडल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजता जेलरोडला बीएमएस मार्केटजवळील आनंद प्लाझा इमारत येथे घडली. या हल्ल्यात किसन साधवानी या व्यावसायिकासह त्यांच्या दुकानातील आकाश नेपाल सिंग हा कर्मचारी जखमी झाला आहे.
जखमी किसन साधवानी यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री नऊ वाजता मॉल बंद केल्यावर किसन साधवानी व त्यांचा भाऊ राम साधवानी हे दोघे घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आनंद प्लाझा या इमारतीलगत गायधनी गिरणीवाला (रा. मोटवानीरोड) आणि त्याचे इतर साथीदार मद्यपान करताना आढळून आले.
यावेळी किसन साधवानी यांनी खिशातून मोबाइल काढला. साधवानी मोबाइलद्वारे पोलिसांना माहिती देण्याचा संशय या मद्यपींना आल्याने त्यांनी थेट किसन साधवानी यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यापैकी एका मद्यपीने पेव्हर ब्लॉकने त्यांच्या डोक्यात तीन वार केल्याने किसन साधवानी जखमी झाले. त्यांच्या मदतीला आकाश नेपाल सिंग आणि सनी मेहंदीवाला हे दुकानातील कर्मचारी धावून आले. मद्यपींनी आकाशवर हल्ला चढवून त्याचेही डोके फोडून त्याला जखमी केले. मॉल जाळून टाकण्याची आणि खून करण्याची धमकी देत हे हल्लेखोर मद्यपी त्यांच्याकडील दुचाकी वाहनांवरून पळून गेले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीएमएस सुपर मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वीच चोरीचा प्रकारदेखील घडला होता.







