बलिप्रतिपदानिमित्त पष्टाणे गावात अनोखा कार्यक्रम

balipratipada-sangeet-sandh

बळीराजाचे पूजन व संगीत संध्या कार्यक्रम संपन्न…

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुक्यातील पष्टाणे गावातील युवकांना सुचलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ‘बलिप्रतिपदा’ निमित्त महानायक , महासम्राट , महातत्ववेत्ता बळीराजाचे पूजन व संगीतमय ऑर्केस्ट्रा , धरणगाव यांचा “संगीत संध्या” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

“ईडा पिडा टळू दे , बळीराजाचे राज्य येऊ दे !” अशा प्रकारे आजही आपल्या माता भगिनी ओवळतांना म्हणत असतात , यावरून बळीचे राज्य किती न्यायी होते याचा अंदाज येतो. हिरण्यकश्यपू चा पणतू , प्रल्हादाचा नातू , विरोचनाचा पुत्र आणि बाणाचा पिता असलेला बळीराजा… बळीराजाच्या राज्यात जे मंत्रिमंडळ होते त्यात खंडोबा , म्हसोबा , जोतिबा , मल्हार आणि मार्तंड यांची देखील पूजा आपल्या माय माऊली करतात. या सर्व गोष्टींवरून एकच लक्षात येते की बळीराजाचे राज्य सर्वांसाठी होते म्हणूनच आजही आपण बळीचे राज्य येवो , अशी आस लावून बसलो आहेत. संक्षिप्त स्वरूपात इतिहास सांगून झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.

 

“अतिथी देवो भव!” या परंपरेप्रमाणे ‘संगीतम ऑर्केस्ट्रा’ मधील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोनाच्या संकट काळात ज्यांनी धीरोदात्तपणे लढा दिला अशा सर्व मान्यवरांचा “कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये PHC सेंटरमध्ये ( सोनवद , पष्टाणे ) येथे कार्यरत असलेले आरोग्यसेवक – आरोग्यसेविका , पष्टाणे खुर्द व बुद्रुक येथे सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका , मदतनीस व आशा स्वयंसेविका आदींचा समावेश होता.
ज्या कार्यक्रमाची पष्टाणे गावातील ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत होते त्या कार्यक्रमाला सुरवात झाली. “संगीत संध्या” ( सुरेल गायनाचा कार्यक्रम ) माणसाला आवड असली की आपल्या आवडीचे काम करण्याची सवळ आपोआपच मिळते याची प्रचिती खऱ्या अर्थाने आली. ‘संगीतम ऑर्केस्ट्रा’ अशाच कलाकारांचा संगम आहे. जे गायन क्षेत्राशी निगडित आहेत व संगीत ज्यांचे पहिले प्रेम आहे अशा अवलीयांचा सुरेख संगम येथे दिसून येतो. भक्तिगीते , देशभक्तीपर गीते , जुन्या – नव्या मराठी व हिंदी चित्रपटातील गीते , लावणी , गझल अशा सर्वसमावेशक गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. गावकऱ्यांनी केलेली फर्माईश सुध्दा पूर्ण करण्याचा कलाकारांनी पुरेपूर प्रयत्न केला. यामध्ये सहभागी कलावंत सचिन भावसार ( MECB धरणगाव ) , मुकेश अहिरे ( MECB चोपडा ) , उज्वल पाटील ( अभियंता MECB अमळनेर ) , सूरज शुक्ल , विकास मोरावकर व सोनाली ताई आदींचा समावेश होता.

 

कार्यक्रमासाठी गावातील अनेक दात्यांनी सढळ हाताने सहकार्य केले. शरद दिलीप पाटील यांनी कार्यक्रमस्थळी ५०१ दिव्यांची रोषणाई केली. श्री स्वामी समर्थ टेंट हाऊस व ओम साई टेंट हाऊस पष्टाणे यांनी स्टेज , साउंड सिस्टीम , मॅट , खुर्च्या आदी व्यवस्था पुरवली. गावातील युवक मित्रांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला गावातील महिला भगिनी , पुरुष बांधव व शाळकरी मुलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर पद्धतीने आयोजन पष्टाणे खु. च्या सर्व ग्रामस्थांनी केले.

 

बळीराजाचे महात्म्य व संगीत संध्या या अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केले तर आयोजकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच किशोरभाऊ निकम यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here