धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) | संजय गांधी निराधार योजनेतून वगळण्यात आलेली दिव्यांग लाभार्थ्यांची नावे पुन्हा समाविष्ट करून त्यांचे थकीत अनुदान त्वरित मंजूर करण्यात यावे, तसेच गरजू दिव्यांगांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी अपंग महासंघाच्या वतीने धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते हे निवेदन सादर करण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचे अर्थसहाय्य वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात अपंग महासंघाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत उद्भवलेल्या सर्व समस्या प्रशासकीय पातळीवर समजून घेत तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सकारात्मक ग्वाही दिली. ते म्हणाले की, “दिव्यांग बांधव हे आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचा सन्मान राखणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. तालुक्यातील प्रत्येक पात्र दिव्यांगाला त्याचा हक्क आणि न्याय मिळवून दिला जाईल.”
हे निवेदन देताना अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी रवींद्र काबरे, रमेश चौधरी, मुकद्दर देशपांडे, बाबूलाल पटेल, भरत पाटील, गजानन महाजन यांच्यासह तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







