जळगाव मनपाचा कारभार म्हणजे ‘अंधेरी नगरी चौपट राजा’! माजी नगरसेवक अशोक लाडवंजारींचा घणाघात

जळगाव

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) । जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन आणि महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अशी सर्व पदे भरून पाच महिने उलटले आहेत. मात्र, सत्ता उपभोगणारे पदाधिकारी आणि प्रशासन सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. निवडणुकांमध्ये जनतेला मोठी आश्वासने देऊनही जळगावकरांच्या पदरी केवळ निराशाच पडली असून, मनपाचा सध्याचा कारभार म्हणजे ‘अंधेरी नगरी चौपट राजा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे, असा घणाघाती आरोप माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी केला आहे.मनपाच्या या मनमानी आणि ढिसाळ कारभारात त्वरित सुधारणा न झाल्यास महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही लाडवंजारी यांच्यासह माजी नगरसेवक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या संदर्भात माजी नगरसेवकांनी जळगाव मनपाच्या कारभाराचे वाभाडे काढताना पुढील प्रमुख मुद्द्यांवर बोट ठेवले आहे: लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत जळगावकरांना चोवीस तास पूर्ण दाबाने पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन तर पूर्ण झालेच नाही, उलट आता आगामी काळात शहरात अनिश्चित काळासाठी १०% पाणी कपात करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. हा जळगावच्या जनतेशी विश्वासघात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरात आरोग्याच्या बाबतीत प्रचंड बोंबाबोंब सुरू असून स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे. मनपाचे वजनकाटे अचानक गायब होतात आणि काही दिवसांनी सापडतात; यातही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरापासून पथदिव्यांबाबत तक्रारी असून निम्म्याहून अधिक पथदिवे बंद आहेत. केवळ मर्जीतल्या मक्तेदाराला मक्ता देण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी जळगावकर शहरवासीयांना वेठीस धरत आहेत.
शहरातील अतिक्रमण हटवण्याचे मोठे आश्वासन दिले गेले होते. मात्र गेल्या पाच महिन्यांत अजिंठा चौफुली, इच्छादेवी, आकाशवाणी, प्रभात कॉलनी चौक, शिव कॉलनी चौक, खोटेनगर, फुले मार्केट आणि सुभाष चौक येथील अतिक्रमण काढण्याचे केवळ नाटक करण्यात आले. कारवाई संपताच अतिक्रमण ‘जैसे-थे’ झाले आहे. अतिक्रमण विभागात रोजदारी कामगार वाढवण्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिका कार्यालयातील अत्यंत महत्त्वाच्या फाईल्स गायब होतात आणि काही दिवसांनी पुन्हा मिळतात. यामागे नक्की काय गूढ आहे, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच २०१२ पासून मनपाच्या मालकीच्या गाळ्यांचा प्रश्न रखडला आहे. मुख्यमंत्री, आमदार आणि आयुक्त एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. यामुळे मनपाचे दरवर्षी १५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान होत असतानाही त्यावर कोणताही ठाम निर्णय घेतला जात नाही.
पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचा केवळ फार्स (नाटक) करण्यात आला. जुन्या गावातील आणि इतर भागांतील नाल्यांमधून काढलेला गाळ व कचरा रस्त्याच्या कडेला नाल्यातच ढीग मारून ठेवण्यात आला आहे. हा गाळ त्वरित न उचलल्यास पहिल्याच पावसात तो वाहून पुन्हा नाल्यात जाईल आणि शहरात पूरपरिस्थिती निर्माण होईल.
रस्ते दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली खरी, पण केवळ आमदारांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचीच दुरुस्ती करण्यात आली. पिंप्राळा ते बजरंग बोगद्या दरम्यानच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी असूनही मनपाने कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच शिवाजीनगर पूल दोन दिवसांसाठी वाहतुकीस बंद ठेवून जी दुरुस्ती केली, ती अत्यंत अपूर्ण व निकृष्ट झाली आहे. संबंधित मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याशिवाय, अजिंठा चौफुली ते जळगाव विमानतळापर्यंत एकही पथदिवा किंवा पोल नसल्याने हा मार्ग अंधारात चाचपडत आहे.

सर्वच पातळीवर सत्ताधारी अपयशी!
“खासदार, आमदार, राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता आणि मनपातही भाजपचेच बहुमत आहे. तरीही जळगावचे हे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नाही. कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात राहिलेला नाही. सत्ताधारी आणि प्रशासन जळगावकरांना नरकयातना देत आहेत.”
— अशोक लाडवंजारी (माजी नगरसेवक)

मनपाने आपला मनमानी कारभार त्वरित सुधारावा, अन्यथा जळगावकरांच्या हक्कासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संयुक्त पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. पत्रक देतांना माजी मनपा नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, युवक महानगर अध्यक्ष विनायक पाटील, माजी युवक महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी, सरचिटणीस सुहास चौधरी, ओबीसी महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, उपाध्यक्ष भगवान सोनवणे, सरचिटणीस रहिम तडवी, चिटणीस नईम खाटीक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here