नाट्यक्षेत्रातील वटवृक्ष कोसळला

    Ram-jadhav

    (दिलीप देशपांडे)
    मामा म्हणजे नाट्यक्षेत्रातील चालत बोलत विद्यापीठ होतं. नाटका प्रति त्यांची श्रद्धा अपार होती. नाटकाशी संबंधित असलेले अनेक पदे मामांनी आपल्या कर्तुत्वाने मिळवले. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. अक्षरशहा वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते सतत रंगमंचावर कार्यरत होते आणि याही वयात संक्षिप्त नटसम्राट सारख्या पल्लेदार वाक्य असलेल्या नाटकाचे प्रयोग करत राहिले.

     

    आव्हानांना भिडण हा मामाचा मूळ स्वभाव. बुलढाणा जिल्ह्यातले मामा खामगावला पिटी टीचर होते. त्याकाळी म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह करून मामींना घेऊन अकोल्यात आले. त्यावेळेस उसळलेल्या जनक्षोभाचा त्यांनी सामना केला. ह्या गोष्टी ते अधून मधून सांगत. त्यानंतर त्यांचा आणि मामी चा संसार फुलत गेला. याला समांतर समवयस्क मित्रांबरोबर त्यांनी रसिकाश्रय या संस्थेची स्थापना केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यावेळेस त्यांनी बसवलेल्या अनेक नाटकांनी मुंबई पुणे येथे धडक द्यायला सुरुवात केली. त्यांनी बसवलेल्या नाटकांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्य रसिकांचे लक्ष या नाट्य वेड्या तरुणाकडे आकृष्ट झाले. विदर्भामध्ये हौशी रंगभूमी करिता स्वतःला झोकून मामा कार्यरत राहिले. दर वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेत मामांच्या नाटकाला काही ना काही बक्षीस मिळत गेले. आणि मग अंतिम नाटकात मिळालेली बक्षीस त्यांच्या दिवाणखान्याची शान वाढवू लागले. अमोल पालेकर जब्बार पटेल सारख्या मातब्बर लोकांसमोर मामांचं नाटक लीलया नंबर मध्ये येत असे.

     

    याच काळात त्यांना धंदेवाईक नाटकासाठी सुद्धा विचारणा करण्यात आली पण हौशी रंगभूमीवर निरतिशय प्रेम असलेल्या मामांनी कुठेही जाण्यास नकार दिला आणि हौशी रंगभूमीला समृद्ध करण्याचं आपलं काम अतिशय श्रद्धेने करत राहिले.
    त्यांना मिळालेली पारितोषिके आणि त्यांनी भूषविलेले ली पद याची यादी फार मोठी आहे. नाट्यक्षेत्रातील सगळी सर्वोच्च पदे मामांनी आपल्या स्वकर्तुत्वाने मिळवली आणि मग राम जाधव यांचा अकोला ही अकोल्याला नवीन ओळख मिळाली.
    मामांना मिळालेली पारितोषिके आणि त्यांना मिळालेली पदे याची जर आपण यादी बघितली तर मामा किती उंचीचे होते हे पाहून आपण स्तिमित होतो.

    रेल्वेची नोकरी सांभाळून त्यांनी संसार केला. तीन मुलं झाले योग्य संस्कार व शिक्षण यांच्या माध्यमातून तीन्ही मुले(दोन मुले व एक मुलगी) आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आयुष्याच्या मध्यावर त्यांच्यावर एक आघात झाला. शेवटपर्यंत साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या मामींनी अर्ध्यावरच साथ सोडली. या धक्क्यातून सावरायला मामांना बराच काळ लागला.

    एक खंत मात्र मनात आजही राहील मामांना मी शेवटपर्यंत आग्रह करत होतो की तुम्ही आत्मचरित्र लिहा म्हणजे पुढच्या पिढीसाठी हा एक अनमोल खजिना राहिल. पण नाट्यक्षेत्रात सर्व पादाक्रांत करणाऱ्या मामांच्या हातून हीच गोष्ट राहून गेली.
    त्यांनी घालून दिलेल्या प्रमाणावर पुढील पिढी कार्यरत राहील हिल हौशी रंगभूमीची भरभराट होईल हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मामा सदैव अकोल्याच्या नाट्य क्षेत्राच्या आसपासच असणार आहे त्यांचे आशीर्वाद सदैव उदयोन्मुख कलावंत बरोबर असणार आहे कारण आयुष्यात नाटक आणि हौशी रंगभूमी एवढीच त्यांची प्राथमिकता होती.
    मामांच्या जाण्याने जाधव कुटुंबांवर परमेश्वराने फार मोठा आघात केला आहे. हे दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो.ईश्वर मामांच्या मृतात्म्यास सद्गती देवो.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here