ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – बहिणीवर प्रेम करणाऱ्या अल्पवयीन युवकाची क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडा-गुंदवली रस्त्या लगतच्या पाईपलाईन शेजारील निर्जन ठिकाणी घडली असून १४ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर प्रेम करणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन युवकाची मुलीच्या भावाने क्रूर हत्या केल्याचे उघड झाले. तर अंगावर थरकाप उडविणाऱ्या या घटनेमुळे ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला नालासोपारामधून अटक केली आहे. अजय रामकरण यादव (20) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी अजय रामकरण यादव व फिर्यादी लालाजी झिनकान यादव (रा .भिवंडी हनुमान नगर, कामतघर) हे जवळचे नातेवाईक असून उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील एका गावात शेजारी राहतात. फिर्यादीचा १४ वर्षीय मृतक मुलगा हा सहा महिन्यांपूर्वी गावी गेला होता. त्यावेळी गावातील आरोपीच्या १४ वर्षीय अल्पवयीन बहिणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. विशेष म्हणजे या दोघांच्या प्रेमसंबंधावरून मूळ गावी या दोन्ही कुटुंबात भांडण झाले होते. त्या भांडणाचा व बहिणीशी असलेली प्रेमसंबंधाचा राग मनात धरून त्याचा काटा काढण्याचे आरोपी अजयने ठरवले. त्याप्रमाणे आरोपी अजय हा भिवंडी तालुक्यातील मृतक मुलगा काम करीत असलेल्या ठिकाणी सायंकाळी पोहचून त्याला बहाण्याने आपल्या सोबत त्याला दापोडा गुंदवली रस्त्यालगतच्या पाईपलाईन शेजारील निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर आरोपीने त्याच्या पोटावर, छातीवर, डोक्यावर वार करून त्याला जीवे ठार मारले होते.
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात 28 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे यांनी आरोपी अजय रामकरण यादव याला नालासोपारामधील एका घरातून अटक केली.







