नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या मास्टरमाइंडला गुजरातमधून अटक

jalgaon-aaropi

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्‍हा सामान्य रुग्णालयात नोकरी लावून देतो, असे आमिष देत शहरासह जिल्ह्यातील तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या या गुन्ह्यातील प्रमुख संशयितास जिल्‍हापेठ पोलीस पथकाने गुजरातमधून अटक केली आहे. योगेश सुधाकर पाटील, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

शहरातील दीक्षितवाडी येथील रहिवासी विनायक दामू जाधव (वय ३३) यांनी १२ ऑक्टोबर २०१९ रोजी जिल्‍हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात योगेश सुधाकर पाटील (वय २९), दीपक काशिराम सोनवणे (वय २९), मंगेश दंगल बोरसे (वय ४५) अशा तिघांनी संगनमत करून जिल्‍हा रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे काही तरुणांना आश्वस्त केले होते. त्यानुसार विनायक जाधव यांच्याकडून दीड लाख, धिरज सरपटे यांच्याकडून ८० हजार, दिनेश एकनाथ पाटील यांच्याकडून १ लाख १५ हजार, गौतम शिवचरण चौहाण यांच्याकडून ८० हजार, अजय राजेंद्र खेडकर यांच्याकडून ८० हजार, रुपेश प्रेमचंद्र पाटील यांच्याकडून १ लाख ३० हजार, राकेश भागवत कोळी यांच्याकडून १ लाख ३० हजार, तसेच इतर बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली होती.

 

या प्रकरणी दीपक सोनवणे याला १७ सप्टेंबरला, तर मंगेश बोरसे याला २१ सप्टेंबरला अटक करण्यात आली. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्यातील प्रमुख संशयित योगेश सुधाकर पाटील हा फरार होता. गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, अजीत पाटील, फिरोज तडवी यांना मुख्य आरोपी योगेश पाटील हा गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने गुजरात गाठले व त्याचा शोध सुरू केला. मात्र, पाटील हा पोलिसांना चकवत होता. नंतर गुजरात पोलिसांच्या सहकार्याने संशयिताला भरूच तालुक्यातील अंकलेश्वर येथून अटक करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here