धुळे (प्रतिनिधी) – शहरातील अंबिकानगरात छापा टाकून पोलिसांनी एका बंद घरातून चार ते पाच लाखांचा गुटखा जप्त केला. काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सपोनि विलास ठाकरे यांच्यासह पथकाने काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास अंबिका नगरात छापा टाकला. त्यादरम्यान एका पूर्वमुखी घराजवळ उभा एक इसम पोलिसांना पाहुन घरात घुसला. त्याने आतून घर बंद केले. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला आवाज दिला. त्याने घराचे दरवाजे उघडले असता घरात एक इसम मिळून आला. त्याने त्याचे नाव अय्युब रशीद खाटीक (वय 54 रा. नॅशनल हायस्कूल, खडीपट्टी, धुळे) असे सांगितले.
घराची तपासणी केली असता घरात खाकी रंगाच्या मोठ्या 13 गोण्यांमध्ये भरलेला विमल पान मसाला, पांढर्या रंगाच्या 13 गोण्यामध्ये व्ही-1 तंबाखू व काही अर्थवट भरलेल्या गोण्यांमधील विमल व व्ही- 1 तंबाखू असा साठा मिळून आली. असा एकूण चार ते पाच लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी अय्युब रशीद खाटीक याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास ठाकरे, पोसई योगेश ढिकले. पोकॉ प्रेमराज पाटील, पोहेकॉ अजिज शेख, पोना भुरा पाटील, पोकाँ सुशील शेंडे, पोकॉ स्वप्निल सोनवणे, पोहेकॉ किरण राजपूत यांच्या पथकाने केली. पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.







