बनावट क्रिडा प्रमाणपत्र घोटाळाप्रकरणी परभणीच्या शिक्षण विभागातील कार्यालय अधीक्षकाला अटक

parbhani-certificateghotala

परभणी – परभणीच्या शिक्षण विभागात बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. या ठिकाणचा कार्यालयीन अधीक्षक संतोष गोपीनाथ कठाळे याला या प्रकरणात रविवारी (दि. 6 डिसें.) नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्याच्या घराच्या झडती घेतली असता, यात अनेक खेळांची बनावट क्रीडा प्रमाणपत्र व क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या वेगवेगळ्या 17 कार्यालयांचे बनावट शिक्के तसेच 40 बनावट प्रस्ताव देखील आढळून आले आहेत. हे सर्व दस्तऐवज पोलिसांनी जप्त करत या रॅकेटमधील अन्य सहकाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

 

 

गंगाखेड तालुक्यातील माखणी हे मुळगाव असलेला संतोष गोपीनाथ कठाळे हा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यालयीन अधीक्षक म्हणून वर्ग दोनच्या पदावर कार्यरत आहे. राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर नागपूर येथील मानकापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून वेगवेगळ्या ठिकाणचे आरोपी या गुन्ह्यात आहेत.

 

 

पोलिसांनी संतोष गोपीनाथ कठाळे या आरोपीला त्याच्या राहत्या घरून अटक केली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना कठाळेच्या घरात अनेक बनावट प्रस्ताव, वेगवेगळ्या क्रीडा कार्यालयांचे तब्बल 17 बनावट शिक्के, नोंदी असलेले रजिस्टर्स, प्रमाणपत्रांच्या याद्या, कोरे धनादेश, सह्या केलेले व काही कोरे क्रीडा प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आढळून आली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक लातूर, औरंगाबाद, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अशा अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयांचे बनावट शिक्के यावेळी पोलिसांना आढळून आले आहेत.

 

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने किती बनावट क्रीडा प्रमाणपत्रे कोणाकोणाला दिली, हा पोलिसांच्या दृष्टीने तपासाचा विषय आहे. यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात 10 आरोपींना अटक केली आहे. याच गुन्ह्यात गंगाखेड तालुक्यातील कल्याण मुरकुटे यास अटक करण्यात आली असून, त्याला 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्ण शिंदे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत. रविवारी (दि.6 डिसें.) त्यांच्यासमवेत आलेल्या पथकातील संतोष राठोड, राघो चिलगर, मिलिंद नसरे, देवेन्द्र काळे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केल्याची माहिती परभणीतील पोलीस सूत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here