सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – पलूस तालुक्यातील पुणदी येथे पिस्तूलाचा धाक दाखवत घरातून तरुणीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत अपहृत तरुणीच्या आईने कुंडल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कृष्णात गावडे (रा. शिगाव, ता. पलूस) हा १५ ते १६ अनोळखी लोकांसह नागराळे रोड येथील फिर्यादी महिलेच्या घरात घुसला. पिस्तूल, तलवार, गुप्ती आणि काठ्यांचा धाक दाखवत त्यांनी घरातील तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. यावेळी विरोध करणाऱ्या तरुणीसह तिची आई, भाऊ आणि आजीला मारहाण केली.
अपहृत तरुणीचा भाऊ आणि आजी झटापटीत जखमी झाले आहेत. या सर्वांना जीवे मारण्याची धमकी देत गावडेसह सर्व जण तरुणीला घेऊन निघून गेले. फिल्मी स्टाइल अपहरणाने परिसरात भीतीचे वातावरण आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार कृष्णात गावडे याच्यासह १५ ते १६ अनोळखी व्यक्तींविरोधात कुंडल पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.







