हिंगोली (प्रतिनिधी) – तालुक्यातील दुर्ग धामणी शिवरात असलेल्या गायरान जमिनीवर अज्ञात आरोपींनी साठा करून ठेवलेला ५० लाख रुपये किंमतीचा वाळूसाठा आज जप्त करण्यात आला. हिंगोली तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक कारवाई केली.
हिंगोली तालुक्यातील दुर्ग धामणी शिवरात गायरान जमिनीवर अज्ञात आरोपींनी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा केल्याची माहिती हिंगोली तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह आज मंगळवारी पहाटे कारवाई करून वाळूचा साठा जप्त केला. वाहनाद्वारे वाळूचा साठा हिंगोली तहसील कार्यालय परिसरात आणण्यात आला असून यासंदर्भात पुढील कारवाई केली जात आहे.
दरम्यान, हा वाळूचा साठा जवळपास ४०० ब्रास असून याची किंमत साधारणपणे पन्नास लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती तहसीलदार माचेवाड यांनी दिली. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.







