लखनौ – उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या २२ वर्षीय तरुणीने वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आपला गर्भपात झाल्याचा आरोप केला आहे. तरुणीच्या पतीला ‘लव्ह जिहाद’ कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. यानंतर तिला नारी निकेतन शेल्टर होममध्ये पाठवण्यात आलं होतं. नारी निकेतनमध्ये आपला छळ करण्यात आल्याचाही तरुणीचा आरोप आहे. पत्रकारांशी बोलताना तरुणीने आरोप केला की, “डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर आपली प्रकृती बिघडू लागली. यानंतरही तेथील कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं”.
“मी पाच ते सहा दिवसांसाठी नारी निकेतनमध्ये होते. यावेळी माझ्या पोटात दुखू लागलं होतं. त्यांनी माझ्या पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर जेव्हा माझी परिस्थिती सुधारत नव्हती तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी मला इंजेक्शन आणि औषधं दिली ज्यामुळे गर्भपात झाला,” असा आरोप तरुणीने केला आहे.
आपण जेव्हा प्रकृतीबद्दल तक्रार केली तेव्हा वॉर्डन आपल्याला ओरडली आणि योग्य ती औषधंही दिली नाहीत असंही तरुणीचं म्हणणं आहे. “डॉक्टरांना माझा गर्भपात झाल्याची माहिती होती. अल्ट्रासाऊंड चेक अपदेखील करण्यात आला. सुरुवातील त्यांना बाळ सुखरुप असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे माझी प्रकृती अजून बिघडली. रक्तस्त्राव सुरु झाला आणि प्रकृतीत अजून बिघाड झाला,” असं तरुणीने म्हटलं आहे.
तरुणीने केलेल्या गंभीर आरोपांवर जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “वेदना आणि रक्तस्त्राव रोखण्यासाठीच तिला गोळ्या देण्यात आल्या होत्या. अल्ट्रासाऊंडमध्ये अर्भक दिसत होतं, पण ह्रदयाचे ठोके ऐकू येत नव्हते. यानंतर तिला मेरठमधील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. पण तिच्या नातेवाईकांना खासगी गाडीतून न्यायचं होतं. सर्व आरोप निराधार आहेत,” असं त्यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी डिसेंबर महिन्यात मुरादाबाद येथून तरुणीचा पती आणि त्याच्या भावाला धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती. राशीद असं तरुणीच्या पतीचं नाव आहे. तरुणीने प्रशासनाकडे पती आणि त्याच्या भावाची सुटका करण्याची मागणी केली आहे.







