(योगेश शुक्ल)
थोर क्रांतीकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा वध केल्याच्या घटनेला १११ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त स्वतंत्र लेख…
२१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटकवाली मंडळी नव्हे,अजूनही तीन व्यक्ती त्या जॅक्सनसाठी,त्याची वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या.

जॅक्सनला यायला उशीर होतोय म्हणून जरा बेचैन झालेला तो तरुण जॅक्सनसाठी राखीव ठेवलेल्या खुर्ची मागेच बसला होता.पडदे उघडले,नाटकाची नांदीहि झाली अन इतक्यात उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करत तो नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन आला.अन पाहुण्याच्या जागी समोरच्या रांगेत स्थानापन्न झाला.अगदी तयारीनिशी आलेल्या त्या तीन व्यक्तीही त्याला आलेला पाहून सुखावल्या,कारणही तसेच होते,त्या व्यक्ती आल्या होत्या, जॅक्सनचा वध करायला.त्या तीन व्यक्ती म्हणजे अभिनव भारतचे देशप्रेमाने ओतप्रोत भारलेले तरुण,विनायकराव देशपांडे,अण्णा कर्वे अन त्यातला अगदी लहान,उण्यापुऱ्या १९ वर्षांचा,तो तेजस्वी चेहऱ्याचा तरुण,अनंत लक्ष्मण कान्हेरे…!
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वी ठरले नाही, परंतु त्याच्या प्रतिक्रिया भारतभर उमटत गेल्या. नाशिकमध्येही स्वातंत्र्य, स्वराज्य, अन्यायाला विरोध यातून प्रयत्न सुरु झाले. त्यातच नाशिकचा गाजलेला ‘वंदे मातरम्’चा खटला, शेतकरी-गाडीवानावर झालेला अन्याय, वामनराव खरे वकील यांना विनाकारण सोसावा लागलेला त्रास, बाबाराव सावरकरांना झालेली शिक्षा, तांबेशास्त्री प्रकरण इत्यादी कारणांवरून नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध करण्याची योजना आखण्यात आली.
तिकडे मंचावर कोदंडरुपातले जोगळेकर “नामे ब्राह्मण खरा असे हा…” म्हणत प्रवेश करणार इतक्यात मंचासमोरून धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले,अन नाशिकचा जिल्हाधिकारी असणारा दृष्ट ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.मागे बसलेल्या त्या क्रांतिकारी तरुणाने सुरवातीस एक गोळी आपल्या पिस्तुलाने पाठीमागूनच जॅक्सनवर झाडली पण ती चुकली म्हणून समोर येऊन पुन्हा चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत ह्या तरुणाने केला. गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला,अन तितक्यात विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले,पण हा अनंत कान्हेरे,त्याचा उद्देश वेगळाच,त्याने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले,स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला,गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला.पुढे खटला चालला,गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले,अनंत कान्हेरे,विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीही दिल्या गेली.
शंकर सोमण, वामन नारायण जोशी, स्वा. सावरकर यांना जन्मठेप, काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्या. या घटनेशी संबंधित अनेकांची धरपकड झाली. त्यांच्यावर खटला चालून त्यांना शिक्षा झाल्या. पकडलेल्यांकडून खटल्याची माहिती काढून घेताना त्यांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या.
नाशिकमधील काही निष्णात वकीलांनी कर्तव्यबुद्धीने या खटल्यातील आरोपींचे वकीलपत्र घेऊन त्यांच्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी याशिवाय त्यांना कमीतकमी शिक्षा व्हाव्यात यासाठी निर्भयपणे प्रयत्न केला. त्यात प्रसिद्ध बॅरिस्टर वाडिया, बॅ. सेठना आणि बॅ. बॅप्टिस्टा अशी तज्ज्ञ व प्रसिद्ध मंडळी होती. या खटल्यात गोवल्या गेलेल्यांपैकी ११ जणांची दोषमुक्त सुटका झाली. एकूण ३० जणांना शिक्षा देण्यात आल्या.
जॅक्सन खटल्याच्या निकालानंतर नाशिक काही काळ मोठय़ा मानसिक दडपणाखाली होते. या काळातील परिस्थिती कशी होती हे पुढील वर्णनावरुन लक्षात येते. ‘नाशिक शहरावर त्यावेळी चिंतेची कृष्षछाया पसरली होती. ती अनेक वर्षे तशीच कायम राहिली. अशा भयग्रस्त वातावरणात अनेक दबल्या आवाजात आणि जरा कमी बोलत..सहानुभूती तर सगळ्यांनाच होती. पण, सरकारी दहशतही तेवढीच होती. सहानुभूती व्यक्त सुद्धा करता येत नव्हती.’
नाशिक नगरपालिकेच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम दिसून आला. १९१० मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी एकूण मतदान ४० टक्के झाले होते. १९०७ मधील मतदानापेक्षा या वेळचे मतदान १३ टक्क्य़ांनी कमी होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे १९०९ मध्ये झालेली जॅक्सनची हत्या हे होते असा निर्वाळा नाशिक फौजदारी कोर्ट (२), १९१० चा मुकदमा फाईलमध्ये आढळतो.
२१ डिसेंबर १९०९ रोजी अनंत कान्हेरेंनी नाशिक कलेक्टर जॅक्सनचा वध केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी नगर पालिकेत या घटनेचा निषेध करणारा ठराव पास करण्यात आला. भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटीश सत्तेला विरोध करणे, स्वातंत्र्य मिळवणे या हेतूने क्रांतीकारकांच्या हालचाली चालू होत्या. देशभक्तांनी आपले तन, मन, धन या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले होते. क्रांतीकारकांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट होती. परंतु, त्यावेळी ती व्यक्त करणे कठीण होते. आज या घटनेला १११ वर्ष पूर्ण झालीत. अनंत कान्हेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले याची आठवण, अभिमान व्यक्त करावा, आदरांजली अर्पण करावी या हेतूने अनेक कार्यक्रम आयोजित करुन, आजच्या तरुण पिढीला त्यांची माहिती करुन द्यावी.
जॅक्सन वधाच्या विरोधात नाशिककरांनी केलेला सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे २२ डिसेंबर १९०९ रोजी नगरपालिकेत या घटनेचा निषेध करणारा जो ठराव पास करण्यात आला होता त्याचा निषेध व्यक्त करुन २१ डिसेंबर २००९ रोजी या घटनेचा भारतीयांना अभिमान वाटावा असा विचार व्यक्त करुन नगरपालिकेत ठराव पास करण्याचे योजण्यात आले. त्या प्रमाणे प्रथम येवला येथील नगरपालिकेत २२ डिसेंबर १९०९ चा ठराव रद्द करुन त्याचा निषेध व्यक्त करणारा ठराव २१ डिसेंबर २००९ मध्ये करण्यात आला. ही ऐतिहासिकदृष्टय़ा एक महत्त्वाची घटना ठरली. येवल्याप्रमाणेच जिल्ह्य़ातील, राज्यातील नगरपालिकांमध्ये असा ठराव पास केला पाहिजे. त्याचा खऱ्या अर्थाने देशाभिमान्यांना, स्वातंत्र्यप्रमींना आणि भारतीय नागरिकांना समाधान व आनंद वाटेल. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मनोबल व सामर्थ्य असावे लागते हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. हे असे सामर्थ्य, मनोबल निर्माण करण्यासाठी सावरकर बंधू, खरे वकील, दत्तोपंत केतकर, श्रीधरपंत वर्तक, कृ. ब. महाबळ, कवी गोविंद (गोविंद त्र्यंबक दरेकर) व इतर अनेक जणांचे प्रयत्न चालू होते. या प्रयत्नांत त्यांनी आपले व्यक्तीगत जीवन बाजुला ठेऊन देशभक्तीला प्राधान्य दिले. या त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा गौरव करण्याबरोबरच एक चिरंतन स्मारक उभारण्याची खरी आवश्यकता आहे.
देशभक्तीने प्रेरीत होऊन स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. मात्र, या घटनेनंतर त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबियांनाही भोगावे लागले. संसार उद्ध्वस्त झालेच होते, परंतु ब्रिटिशांच्या सरकारी धाकामुळे या कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उरले नव्हते. निराधार अवस्थेत हाल अपेष्टा सहन करीत त्यांना जीवन काढावे लागले. बाबाराव सावरकरांच्या पत्नी येसूबाईंना नाशिकमधील दातार कुटुंबियांचा मोठा आधार मिळाला. परंतु, शेवटपर्यंत पतीभेट होऊ शकली नाही. आपल्या पतीच्या दर्शनासाठी त्या रात्रंदिवस तळमळत होत्या.
विनायकराव देशपांडे यांना फाशी झाल्यानंतर त्यांच्या पत्नीची खूपच दैनावस्था झाली होती. त्यावेळी सरकारने त्यांची सर्व स्थावर जंगम मालमत्ता जप्त केली होती. शेवटी सिन्नर तालुक्यातील सोनंबे येथे त्यांच्या भाच्याकडे त्या आल्या. शेवटपर्यंत त्या तेथेच राहिल्या. त्यांच्या भाच्यानेच त्यांचा सांभाळ केला होता. विनायकराव देशपांडेंच्या पराक्रमाची साक्ष देणारे एक छोटे मंदिर सोनांब्याच्या गावकऱ्यांनी बांधलेले आज तेथे पहावयास मिळते.
आपल्या देशासाठी, देशबांधवांसाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले, रक्त सांडले, त्यांच्या पराक्रमाचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक ठरते. आपल्या देशाचा इतिहास लिहिताना देशाभिमानाने प्रेरित होऊन त्या त्या घटनांकडे पाहिले जावे. परकियांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये वास्तवता संपूर्णत: येण्याची शक्यता नसते. आपल्या देशातील घटनांचा अन्वयार्थ आपण जेवढा अचूकपणे लावू शकतो, तेवढा परकियांना लावता येणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊनच आपल्या देशातील पुढील पिढिला आपला खरा इतिहास माहिती व्हावा हा हेतू लक्षात घेऊन नागरिकांचे त्याला सहकार्य होणे गरजेचे ठरते. नाशिकमधील ही घटना नाशिकपुरतीच मर्यादित नव्हती तर देशाबाहेर इंग्लड, फ्रान्सशीही संबंधित होती. हे लक्षात घेऊन नाशिकच्या या घटनेचा समावेश अभ्यासक्रमातही अंतर्भूत होणे गरजेचे आहे.
आपल्या कर्तृत्वाने त्या क्रूरकर्मा जॅक्सनचा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला.अनंत कान्हेरे सारखे वीरपुत्र जिच्या उदरात जन्मले अशी आपली भारतमाता आपल्या पुत्रांच्या कर्तृत्वाने पवित्र झाली,भारतमातेच्या प्रेमापोटी प्राणांची आहुती देणारे असे थोर क्रांतीकारक आपल्या मनांतून अन रक्तातून सदैव जिवंत राहायला हवेत.आज २१ डिसेंबर, जॅक्सन वधाच्या घटनेचे स्मरण करून आपण या वीराला अभिवादन करूया!







