सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – प्रेयसीची हौस भागवण्यासाठी प्रियकराने चक्क मोटरसायकल चोरीचा व्यवसाय सुरू केला होता. प्रियकराने प्रेयसीच्या हौसेसाठी आठ मोटरसायकल चोरी केल्या होत्या. या व्यक्तीला पोलिसांनी पकडून त्याच्याकडून आठ गाड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी महादेव सगर (वय 26 रा. 32 खोल्या पंढरपूर) या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. पंढरपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
विठुरायाच्या देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. ही मोटर सायकल पंढरपूर शहरातील काळा मारुती चौक येथून चोरीस गेल्याचे तक्रार सोपान नारायण बंडगर (वय ४२, रा. सलगरे, ता-मिरज, जि.सांगली) व रुकमांगद एकनाथ सोनुरे यांनी दिली होती. हे दोघे २५ डिसेंबर रोजी पंढरपूर दर्शनासाठी मोटरसायकल वरून आले होते.
पंढरपूर पोलिसांनी काही तासातच तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी काही तासातच महादेव सगर याला ताब्यात घेऊन चोरीला गेलेली मोटार सायकल जप्त केली. त्याचबरोबर त्याच्याकडून इतर ७ मोटरसायकली हस्तगत करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी महादेव सगर यांच्याकडे चौकशी केली असता. त्याने या मोटर सायकल प्रेयसीची हौस पुरविण्याकरिता आपण चोरी केल्या असल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, बिपीन ढेरे, गणेश पवार, शरद कदम, सुजीत जाधव, सुनील बनसोडे, राजेश गोसावी यांनी केली आहे.







