ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – एका व्यापाऱ्याने घरफोड्या करून मिळविलेला पैसा डान्सबारमधील बारबालांवर उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे काही मित्रांच्या संगतीने लागलेल्या दारूची बाटली अन् बारबालांच्या नादात तो सराईत घरफोड्या करणारा गुन्हेगार झाल्याने पोलीसही चक्रावून गेले.
अखेर मानपाडा पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा शिताफीने तपास करून घरफोड्या करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक केली. हा व्यापारी सराईत घरफोड्या कसा झाला याचा उलगडा करीत त्याने आतापर्यंत चार घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून सहा लाख 75 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. बबन दशरथ जाधव (वय 39 रा. इगतपुरी ) असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
आरोपी बबन हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका खेड्यात आपल्या कुटुंबासह राहतो. टाळेबंदीच्या काळात बबन हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी आदी परिसरातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून कल्याणच्या घाऊक बाजारात विक्रीसाठी येत होता. यामधून त्याची दररोज चार ते पाच हजार रुपयांची कमाई व्हायची. मात्र, काही मित्रांच्या नादी लागून तो डान्सबारमध्ये मद्यपान करण्यासाठी जाऊ लागला. हळूहळू त्याला दारूच्या बाटलीसह बारबालांचा चांगलाच नाद लागला. त्यानंतर तो भाजीपाला विक्रीतून मिळालेले पैसे बारबालांवर उधळू लागला. दोन-दोन दिवस कल्याणमध्येच मुक्काम ठोकून तिसऱ्या दिवशी रिकाम्या हाताने घरी परतत होता. पत्नीला व्यवसाय झाला नसल्याचे सांगत महानगरपालिकेने सर्व भाजीपाला उचलून नेला, इत्यादी कारणे सांगून त्याने घरी पैसे देणे बंद केले. त्यामुळे घरी पत्नी आणि मुलांची उपासमार सुरू झाली.
आरोपी बबन शेतकऱ्यांकडून उधारीवर भाजीपाला घेऊन कल्याणच्या बाजारात विकत होता. त्यातून मिळालेले पैसे दारू आणि बारमध्ये उडत होता, त्यानंतर बारमध्ये उडवण्यासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे अखेर त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. डोंबिवली परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यास सुरुवात केली. अखेर तो मानपाडा पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चार ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली असून घरफोडीतील सर्व पैसा त्याने बाई आणि बाटलीवर उडवल्याची कबुलीही मानपाडा पोलिसांनी दिली आहे.
आता मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इतर चार गुन्हे दाखल करून त्याला अटक केली, असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौरे यांनी दिली आहे. आता बारबालांच्या नादात लागून घरफोड्या करणाऱ्या व्यापार्याला पोलिसांनी कोठडीचा रस्ता दाखवला आहे. तसेच त्याच्याकडून चार घरफोडीतील सहा लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहे.







