मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचे चित्रीकरण करणाऱ्याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. समीर शेख (वय 38) असे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी 30 वर्षांच्या एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. ती महिला आपल्या मित्रांसह गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्यावेळी ती रेस्टॉरंटच्या स्वच्छतागृहात गेली. दरवाजाला असलेल्या फटीतून एक व्यक्ती चित्रीकरण करत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने प्रसंगावधान राखत मदतीसाठी असलेला अलार्म वाजवला. त्याचा आवाज ऐकून रेस्टॉरंटचे कर्मचारी धावत आले. त्यांना घडलेला प्रकार समजताच त्यांनी समीर शेखला पकडले.
महिलेने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तक्रारदार महिला आणि समीर शेखला पोलीस ठाण्यात आणले. महिलेचा जबाब नोंदवल्यावर आरोपी समीर शेखला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.







