वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या लक्षात घेता आज (दि.६) वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय ,वर्धा येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, तक्रार निवारण समितीच्या वतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील बऱ्याच शाळांमधे लिपिक तसेच शिपायांची पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत, अनेक शाळांमधे एकही लिपीक तथा शिपाई कार्यरत नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती असताना वेतन देयक सादर करतांना, वेतनाची हार्ड कॉपी देताना लिपिकाने हजर राहावे असा आग्रह धरला व वेठीस धरल्या जाते कार्यालयात काही कर्मचाऱ्यांकडून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणूक न मिळणे, वेतन देयक तसेच कार्यालयाशी संबंधित पत्रव्यवहार करतांना पोचपावती न देणे व आवक-जावक बुकात स्वतः शिक्षक/ कर्मचाऱ्यांना नोंद घ्यायला लावणे, वेतन देयक ऑनलाईन पध्दतीने असतांना अनावश्यक कागदपत्राची मागणी करणे व छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेठीस धरणे, वेतन देयकाच्या बॅक काॅपी बाबत मा शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या दिनांक 26 फेब्रुवारी 2019च्या आदेशाचे पालन न करणे, जीपीएफ व्याजाची आकारणी चुकीच्या पद्धतीने करणे, जीपीएफ /डीसीपीस च्या पावत्या मागील अनेक वर्षापासून अप्राप्त असणे, थकीत वेतन तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक तात्काळ अदा करणे, सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडी वरील शिक्षकांचे वेतन एक तारखेला न होणे आदी विषयासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी अधिक्षक श्री.गाढे यांनी तात्काळ सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी म रा शिक्षक परिषद, तक्रार निवारण समितीचे अनिल टोपले, संजय बारी, कुंडलिक राठोड, मुकेश इंगोले, मनीष मारोटकर, प्रवीण घोडखांदे, नरेंद्र ढोरे, दिलीप मोहोड, मनोज वाणी, नितीन राठोड, विलास बरडे, संदीप चांभारे, हर्षा भुतडा, परमेश्वर केंन्द्रे, ज्ञानेश्वर मुंगळे यांच्या सह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





