दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मनमानी कारभार शेतकरी बेहाल, व्यापारी मात्र मालामाल : हेमंत साळुंके

hemant-salunkhe-shindkheda-shivsena

कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन उभारणार; शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके

शिंदखेडा (प्रतिनिधी) – दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मनमानी कारभार सुरु असून यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बेहाल झाले आहेत. गेल्या 15 दिवसापासून शेतकऱ्यांची वाहने दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिंदखेडा येथील जागेवर उभी आहे. याबाबतीत शिंदखेडा व दोंडाईचा येथील जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांची कापसाची भरलेली वाहने खाली होत असल्याच्या तक्रारी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या. याची शहानिशा करण्यासाठी श्री.साळुंके स्वत: शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिंदखेडा येथील आवारात गेले. तेथे माकेट कमिटीचे अधिकारी, सचिव पंडित पाटील, सीसीआयचे अधिकारी आदित्य वामन यांच्यासह जिनिंग प्रेसिंगचे ट्रेडर व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व अधिकारी यांचे शाब्दीक वाद झालेत. यावेळी शेतकऱ्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला होता.

सविस्तर वृत्तानुसार, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत सीसीआय हमीभावाने कापूस खरेदी प्रकिया राबवित आहे. चालू वर्षी शिंदखेडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पन्न आलेले आहेत. बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस देणे पसंत करीत आहेत. परंतु या प्रक्रियेमध्ये दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांकडे कानाडोळा करुन बाजार समिती ठराविक संचालक व व्यापारी यांचेशी संगनमत करुन व्यापाऱ्यांचा कापूस सीसीआयला मोजून देण्याचा नियोजनबध्‍द कार्यक्रम राबवित आहेत.

यांसंदर्भात बोलतांना कापूस उत्पादक शेतकरी म्हणाले की, सीसीआय कापूस खरेदी करतांना जिनिंगचे मालक एका क्विंटलला 3 किला पर्यंत कट्टी लावत आहेत. शिवाय व्यापारी लोकांची वाहने रोजच्या रोज खाली होत आहेत. सदर प्रकार ताबडतोब बंद होऊन दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापाऱ्यांमध्ये असलेले संगनमत ताबडतोब बंद झाली पाहिजे, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके म्हणाले की, शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय ताबडतोब थांबला पाहिजे. व्यापाऱ्यांना मालामाल करुन शेतकऱ्यांना बेहाल करु नका. ज्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बाजार समितीची स्थापना झालेली आहे. तिचा उपयोग शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करा. शेतकऱ्यांचा कापूस रीतसर मोजावा. शेतकऱ्यांच्या कापसाला न्याय द्यावा. व पूर्ववत कापूस खरेदी केंद्र सुरु ठेवावे. यात सुधारणा न झाल्यास शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, उपतालकाप्रमुख संतोष देसले, युवासेनेचे गणेश परदेशी, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here