बदायू (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका 50 वर्षीय अंगनवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आलीय. सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मारहाण करण्यात आली.
धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवल्याचंही समोर आलंय. मृत महिला अंगनवाडी सहाय्यक म्हणून काम करत होती. 3 जानेवारी सायंकाळी ही महिला मंदिरात पूजेसाठी गेली होती. या दरम्यान मंदिरात उपस्थित पुजाऱ्यासहीत तीन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. 3 जानेवारी रोजी रात्री आपल्या गाडीतून पीडित महिलेचा रक्तबंबाळ मृतदेह तिच्या घराबाहेर फेकून आरोपी तिथून पसार झाले होते.
“उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 वर्षीय महिलेचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत आढळला होता. पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारावर कलम 302 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक केली आहे. तसंच या प्रकरणात प्राथमिक तपास करत असताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे.”
महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी महिला मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. पण बराच वेळ घरी परतली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. “रात्री अकरा वाजता मंदिराचे पुजारी गंभीर अवस्थेत महिलेला घरी घेऊन आले. महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. रक्तस्त्राव जास्त झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. पुजारी, सत्यनारायण सोबत वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल होते.”
मंगळवारी 5 जानेवारी पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. बुधवारी 6 जानेवारी पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली. मुख्य आरोपी पुजारी सत्यनारायण फरार आहे.







