नाशिकमधील सिटी पॅलेस हॉटेलमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू

dead-body

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमधील खोलीत एका तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. मृत्यूचे कारण विच्छेदनानंतर स्पष्ट होईल, असे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. ही तरुणी बोईसर येथील रहिवाशी असून, पालघर येथील संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तन्मय प्रवीण धानवा (वय २१, रा. कोळीपाडा, पालघर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. अर्चना सुरेश भोईर (वय २१, रा. बोईसर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलच्या खोलीत एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना फोनवरून देण्यात आली.

पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी या तरुणीचे काही नातेवाईकही तेथे उपस्थित होते. पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आरोपी हा मुलीच्या ओळखीचा होता. तो गेल्या काही दिवसांपासून तिला दमदाटी करीत होता. ही माहिती तिने कुटुंबीयांना दिली होती.

मंगळवारी संबंधित तरुण तिच्या कॉलेजला गेला होता. तिला मारहाण करून बळजबरीने तो घेऊन गेल्याचे तेथील काही विद्यार्थ्यांनी सांगितल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. रात्री ती तिच्या खोलीवर न परतल्याने आम्ही शोधाशोध करीत होतो. संबंधित तरुणानेच तिला मारले असावे, असा संशय मुलीच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here