अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दोन्ही आदर्श गावांत ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध घेण्याला विरोध करून मैदानात उतरलेल्यांना ग्रामस्थांनी नाकारले आहे. हिवरे बाजारसोबतच राळेगणसिद्धीमध्येही असे बंड फसले आहे. हिवरे बाजार ग्रामपंचायत पुन्हा पोपटराव पवार यांच्या ताब्यात आली तर राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निकटवर्तीयांनी पुन्हा सत्ता मिळविली. दोन्ही ठिकाणी बंड केलेल्या विरोधकांचा सुपडा साफ झाला.
राळेगणसिद्धीत हजारे यांचे निकटवर्तीय, माजी स्वीय सहायक अशा मंडळींनी एकत्र येत स्थापन केलेल्या ग्रामविकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळाल्या आहेत. विरोधकांनी उभ्या केलेल्या शामबाबा पॅनलचा सपशेल पराभव झाला. माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, अनिल मापारी, लाभेष औटी, उद्योजक सुरेश पठारे यांच्या पॅनलने सत्ता राखली आहे.
नेहमीप्रमाणे गावात निवडणूक बिनविरोध करायचे ठरले होते. यावेळी आमदार नीलेश लंके यांनीही पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी निधी देण्याची योजनाही जाहीर केली होती. पहिल्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याला संमतीही झाली होती. मात्र, नंतर काही मंडळींनी हजारे यांच्याकडे जाऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. आम्हाला लोकशाही कळावी, यासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. हजारे यांनीही त्यांना समंती दिली. मधल्या काळात दोन जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.






