प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण: सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनीला परत केली हरवलेली चांदीची पैंजण

चांदीची पैंजण

अहिल्यानगर (प्रतिनिधी तुषार महाजन) | शिक्षण संकुलाच्या परिसरात हरवलेली चांदीची पैंजण शोधून ती संबंधित विद्यार्थिनीला प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरक्षा रक्षक विजय भिमाजी पारधे यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे उदाहरण शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरले आहे.

 

शिक्षण संकुलात इयत्ता ११ वी (कला) शाखेत शिकणारी विद्यार्थिनी रिया देविदास मोरे हिची चांदीची पैंजण संकुल परिसरात कुठेतरी हरवली होती. दरम्यान, सुरक्षा रक्षक विजय भिमाजी पारधे हे आपल्या नेहमीच्या गस्तीवर असताना त्यांना ही पैंजण मिळून आली. आपली जबाबदारी ओळखून त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता, सदर पैंजण तातडीने महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे यांच्याकडे सुपूर्द केली.

प्राचार्य विकास शिवगजे यांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित विद्यार्थिनीची ओळख पटवली आणि हरवलेली पैंजण तिला परत केली. आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित परत मिळाल्याने विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.

सुरक्षा रक्षक विजय पारधे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या वस्तूंच्या सुरक्षेबाबत दाखवलेल्या सतर्कतेबद्दल शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे कौतुक केले जात आहे. या कामगिरीबद्दल सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या हस्ते विजय पारधे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या या कृतीमुळे सुरक्षा रक्षकांप्रती असलेला आदर वाढला असून, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here