इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे) | शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजकुमार शेलार यांना युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा ‘राजश्री शाहू पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते डॉ. शेलार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. कैलास कदम, प्रा. कृष्णा ताटे, अनेक आजी-माजी नगरसेवक आणि समाजसेवक उपस्थित होते.
डॉ. राजकुमार शेलार यांनी भगवान इंगळे यांच्या ‘ढोर’ या दलित आत्मकथनावर एम.फिल, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘भटक्या विमुक्त जमातींची आत्मकथने: स्वरूप आणि चिकित्सा’ या विषयावर पीएच.डी. (Ph.D) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या ‘दलित आत्मकथने आणि भगवान इंगळे यांचे ढोर आत्मकथन’ या ग्रंथाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे. राष्ट्र सेवा दल आणि इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीनेही त्यांचा भव्य नागरी सत्कार केला आहे.
पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. शेलार म्हणाले की, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून, एक शिक्षक म्हणून समाजाप्रती असलेल्या माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. लोकराजा राजश्री शाहू महाराजांची समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाची मूल्ये जपून समाजाप्रबोधनाचे कार्य अधिक समर्पितपणे करण्याचा प्रयत्न मी करीन.” त्यांनी या प्रवासात साथ देणाऱ्या आई-वडील, गुरुजन, सहकारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
डॉ. राजकुमार शेलार यांच्या या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह भैय्यासाहेब रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे यांच्यासह शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या पुरस्काराचे श्रेय संस्था अध्यक्ष पत्रकार शिवाजी शिंदे आणि त्यांच्या संस्थेच्या कार्यालाही दिले जात आहे.







