विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न

विश्वासराव रणसिंग

इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे) | कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

 

या प्रसंगी उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, क्रीडा संचालक सुहास भैरट, डॉ. विलास बुवा, डॉ. रामचंद्र पाखरे, डॉ. ज्योत्सना गायकवाड, प्रा. राजेंद्रकुमार डांगे, प्रा. विनायक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रा. राजकुमार शेलार यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्यसंपदेचा आणि सामाजिक योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अण्णाभाऊ साठे यांचा गाजलेला रशिया दौरा हा मराठी साहित्यविश्वासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरल्याचे नमूद करत त्यांच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या मान्यतेवर त्यांनी प्रकाश टाकला.

‘फक्त दीड दिवसाची शाळा’ या अनुभवातून अण्णाभाऊंनी आत्मसात केलेले ज्ञान, त्यांची अंगभूत जिद्द, लोककला आणि साहित्यावरील अतूट निष्ठा यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘जनतेचे साहित्यिक’ बनल्याचे प्रा. शेलार यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन, लेखन आणि सामाजिक जाणिवा विकसित कराव्यात, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अभिजीत शिंगाडे यांनी केले. या प्रेरणादायी सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here