नगर (प्रतिनिधी तुषार महाजन) | कठोर परिश्रम, जिद्द आणि अभ्यासातील सातत्याच्या बळावर श्रद्धा मोहिनी नयन पाटील यांनी चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि कठीण समजली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. पहिल्याच प्रयत्नात देशातील या सर्वोच्च परीक्षेला गवसणी घालत त्यांनी ‘CA’ पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
CA श्रद्धा मोहिनी नयन पाटील या कै. नामदेव भदु पाटील, कै. लताबाई नामदेव पाटील, कै. पांडुरंग दगडू पगारे व गं. भा. कमलाबाई पांडुरंग पगारे यांच्या नात असून, त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मिळवलेले हे यश संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे. पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण करणे ही अत्यंत मोठी कामगिरी मानली जाते. या यशामागे श्रद्धा यांची अभ्यासातील निष्ठा, नियोजनबद्ध तयारी, आत्मविश्वास आणि कुटुंबीयांचे मोलाचे पाठबळ असल्याचे सांगण्यात येत आहे. “ध्येय निश्चित असेल, मेहनत प्रामाणिक असेल आणि प्रयत्न सातत्यपूर्ण असतील तर यश निश्चित मिळते,” हे श्रद्धा पाटील यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
चार्टर्ड अकाउंटन्सी हे देशातील अत्यंत प्रतिष्ठित व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक आहे. या परीक्षेचा निकाल अतिशय कमी लागत असल्याने विद्यार्थ्यांना कठोर अभ्यास, प्रचंड संयम आणि सातत्याची गरज असते. अशा कठीण परिस्थितीतही श्रद्धा पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून तरुण पिढीसमोर, विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक नवीन आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या गौरवशाली यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून श्रद्धा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्व स्तरांतून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.







