अंबरनाथ पोलिसांची संवेदनशीलता : ऐनवेळी मदतीला धावून येत NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीचे वाचवले वर्ष

NEET

अंबरनाथ (संपादक सुनिल पाटील) | NEET परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासाठी आवश्यक फोटो नसल्याने एका विद्यार्थिनीचा मोठा खोळंबा झाला होता. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या अंबरनाथ पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे या विद्यार्थिनीला वेळेत परीक्षा देता आली. पोलिसांनी केवळ तिला आर्थिक मदतच केली नाही, तर स्वतःच्या सरकारी वाहनातून नेऊन तिचे फोटो काढून देत खाकी वर्दीतील ‘माणुसकी’चे दर्शन घडवले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या केंद्रीय विद्यालयात NEET परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर आलिशा नावाची विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी पोहोचली. मात्र, नियमानुसार आवश्यक असणारे फोटो तिच्याकडे नसल्याने परीक्षा केंद्र प्रशासनाने तिला प्रवेश नाकारला. ऐन परीक्षेच्या वेळी ही अडचण समोर आल्याने आलिशा प्रचंड घाबरली. त्यातच तिच्याकडे पैसेही नव्हते आणि सोबत कोणतेही नातेवाईक हजर नव्हते. यामुळे तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.

परीक्षा केंद्राबाहेर बंदोबस्ताचे नेतृत्व करत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद आणि सहायक पोलीस निरीक्षक श्री. पानसरे यांच्या ही बाब लक्षात आली. विद्यार्थिनीची अडचण आणि तिची अवस्था पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ मदतीचा हात पुढे केला. पोलिसांनी सर्वात आधी त्या विद्यार्थिनीला धीर दिला आणि फोटोसाठी लागणारी आर्थिक मदत केली. वेळेची कमतरता लक्षात घेऊन अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या सरकारी वाहनातून महिला पोलीस अंमलदारांसह तिला तातडीने जवळच्या फोटो स्टुडिओमध्ये पाठवण्यात आले. स्टुडिओमधून तात्काळ फोटो काढून तिला पुन्हा परीक्षा केंद्रावर आणण्यात आले.

पोलिसांच्या या तत्परतेमुळे आलिशाला वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला आणि ती कोणतीही अडचण न येता आपली NEET परीक्षा देऊ शकली. अंबरनाथ पोलिसांची ही संवेदनशीलता, तत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी पाहून उपस्थित पालक आणि नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खाकी वर्दीतील या संवेदनशीलतेमुळे एका विद्यार्थिनीचे वर्ष वाया जाण्यापासून वाचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here