कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | जिल्ह्यातील व्हनाळी येथील प्रगतशील शेतकरी आणि मेजर आनंदराव घाटगे दूध संस्थेचे अध्यक्ष नामदेव ज्ञानदेव वाडकर (वय वर्षे) यांचा शेतात वैरण आणायला गेले असताना पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी, २१ जून २०२६ रोजी घडली. त्यांच्या या आकस्मिक निधनाने संपूर्ण व्हनाळी गावावर आणि परिसरवार शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव वाडकर हे रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांसाठी वैरण (चारा) आणण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील वैरण घेऊन बांधावरून खाली उतरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मयत’ घोषित केले.
नामदेव वाडकर हे केवळ एक प्रगतशील शेतकरी नव्हते, तर व्हनाळी येथील ‘मेजर आनंदराव घाटगे दूध संस्थेचे’ अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. आपल्या मनमिळावू आणि अजातशत्रू स्वभावामुळे ते संपूर्ण गावात सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने व्हनाळी गावाने एक सुविद्य मार्गदर्शक आणि कष्टाळू शेतकरी गमावला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा आणि सुखी परिवार आहे. वाडकर यांच्या निधनामुळे वाडकर कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







