शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) | भारतात उगम पावलेल्या प्राचीन योगविद्येचे महत्त्व जगभर पोहोचावे आणि निरोगी आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून शिर्डी येथील ‘साईसेवा निवासी बौद्धिक अक्षम मुला-मुलींच्या शाळेत’ विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला.
२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे सर्वात जास्त वेळ पडतात. याला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत आणि विज्ञानात या दिवसाचे अध्यात्मिक व आरोग्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे, याच पार्श्वभूमीवर हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो.
या विशेष योग सत्रात योग प्रशिक्षकांनी उपस्थित दिव्यांग मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने योगाचे मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी मार्गदर्शकांनी दिली. मुलांनी प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार प्राणायाम आणि विविध आसने करत योग साधनेचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. योग सत्र संपल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून “योग सर्वांसाठी” हा महत्त्वाचा संदेश समाजात पोहोचवण्यात आला.







