सुरत (गुजरात) – मैत्रीच्या निर्मळ नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातल्या आरोपीनं जुन्या मैत्रिणीच्या विश्वासाचा फायदा घेत तिला एका हॉटेलमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यानं ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. हा सर्व प्रकार 2019 पासून सुरु होता. या प्रकरणात अखेर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपला गुन्हा उघड होतात आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुजरातमधील सुरत शहरातील दक्षेश मिस्त्री पीडित महिलेला लग्नापूर्वीपासून ओळखत होता. या महिलेचं 2014 साली लग्न झालं. तिला आता दोन मुली देखील आहेत. 2019 साली एका रेस्टॉरंटमध्ये अचानक त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. त्यांनी परस्परांशी फोन नंबर शेअर केले. पीडित महिलेनं RTO ऑफिसमधील काही कागदपत्रांबाबत आरोपीशी संपर्क साधला.
त्यावेळी आरोपीनं तिला एका हॉटेलमध्ये नेलं. हॉटेलमधील पेयात आरोपीनं गुंगीचं औषध मिसळून आपल्याला बेशुद्ध पाडलं असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. त्यानंतर आरोपीनं महिलेवर बलात्कार केला. या बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ चित्रण करुन आरोपी महिलेला धमकावत असे. महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेत आरोपीनं तिच्यावर अनेकदा बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.







