खाऊसाठी रडणाऱ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पित्याने दारावर आपटले…

arrested

गोंदिया – आईवडिलांसाठी पोटची मुलं जीव की प्राण असतात. मात्र, या प्रेमळ नात्याला धक्का देणारी घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात घडली आहे. जन्मदात्या वडिलांनीच किरकोळ कारणावरून आपल्या दीड वर्षे वयाच्या मुलीचा खून केला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. मुलीला खाऊ खाण्यासाठी ५ रुपये न दिल्याने ती रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला ‘जा मर’ असे म्हणून जोरात दारावर आपटले. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीचा नंतर मृत्यू झाला. विवेक विश्वनाथ उइके (वय २८) रा. लोणारा असे आरोपी पित्याचे नाव असून वैष्णवी विवेक उइके (वय १ वर्ष ८ महीने) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलीची आई वर्षा विवेक उके (२२) हिने तिरोडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी पिता विवेक विश्वनाथ उइके याला अटक केली आहे. याप्रकरणी तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुवते करीत आहेत.

मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी विवेक सकाळी ८ वाजता कोडेलोहारा येथे लग्नासाठी गेला होता. लग्न समारंभ आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता तो घरी परतला. सायंकाळी ७ वाजता मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी वर्षाने पती विवेककडे ५ रुपये मागितले. तेव्हा पतीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे मुलगी जोरजोरात रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पती विवेकने मुलगी वैष्णवीला पत्नी वर्षाकडून आपल्याकडे खेचून घेतले व विनाकारण का रडते असे म्हणत मुलीला जोरात दारावर आपटले. तिथे पत्नी वर्षा व चिमुकलीची आजी ताराबाई उपस्थित होत्या. वर्षाने पतीला अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिलासुद्धा ढकलल्याने ती बाजूला पडली. मुलगी वैष्णवी पायरीजवळ पडली होती. तिच्या डाव्या गालावर व डोक्यावर इजा झाल्या होता. बेशुद्धावस्थेत पडलेल्या वैष्णवीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत असताना पती विवेकने पुन्हा पत्नी वर्षाला मारहाण केली. त्यानंतर विवेक व सासूने मुलीला दवाखान्यात नेतो म्हणून सांगितले व ते तिथून निघून गेले. दरम्यान, काही वेळाने मुलीला घेऊन परत आले असता मुलगी मरण पावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here