नवी दिल्ली – पाच वर्षांची मुलगी आणि तिचा आठ वर्षांचा भाऊ या दोघांना पळवून त्यांच्यावर 20 तास अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. ही घटना नवी दिल्लीत घडली असून या प्रकरणी एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील उस्मानपुरा परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव शिव कुमार (46) असं आहे. 23 जानेवारी रोजी ही दोन्ही भावंड एका बागेसमोर खेळत होते. शिवकुमार तिथे आपली रिक्षा घेऊन आला. त्याने त्या मुलांना हेरलं. बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ही मुलं त्यांच्या घरापासून दूर खेळत आहेत.
त्यामुळे तो खाऊ घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्यांना त्याचं आमिष दाखवलं. खाऊ मिळेल या आमिषाला भुललेली मुलं त्याच्या रिक्षात बसली.खाऊ मिळेल या आमिषाला भुललेली मुलं त्याच्या रिक्षात बसली. तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने या दोघांना बांधून घातलं आणि जवळपास 20 तास त्यांच्यावर अत्याचार केले. मुलांनी आरडाओरडा करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्यांना मारहाण केली.
दोन्ही मुलांची स्थिती बिघडलेली वाटू लागली तेव्हा त्याने परत त्यांना रिक्षात बसवलं आणि जिथून उचललं होतं तिथे आणून सोडलं. त्यांना सोडून तो फरार झाला. दरम्यान, मुलांच्या कुटुंबाने त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यामुळे मुलांचा शोध सुरू होता. ही मुलं घरी पोहोचल्यावर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी आरोपीचा शोध करायला सुरुवात केली.
मुलांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा त्यांना हवी असलेली रिक्षा दिसली. तब्बल 12 दिवस शोध घेतल्यानंतर शिवकुमारला पकडण्यात पोलिसांना यश आलं.







