पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – खडकी परिसरातील एका चर्चमधून चोरट्यांनी दानपेटीच चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खडकीत एका शाळेतील विद्युत मोटार चोरल्याचे समोर आले आहे.
याबाबत जेसू अँथनी (वय ६८, रा. खडकी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी परिसरात असलेल्या चर्चमधून चोरट्यांनी दानपेटी पळवून नेल्याचे जेसू यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खडकी पोलिसांकडे तक्रार दिली. चर्चच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी दानपेटीतील तीन हजारांची रोकड आणि दानपेटी असा चार हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलिस हवालदार हनुमंत जाधव अधिक तपास करीत आहेत.







