चेन्नई, दि १४-भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. भारतीय फलंदाजांची हाराकिरी हे पराभवाचे महत्त्वाचे कारण होते. त्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माच्या सुमार फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या टीकाकारांना रोहितने दुसऱ्या कसोटीत शतक ठोकत दमदार उत्तर दिले. गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर रोहितने आक्रमक पवित्रा घेत सातवं कसोटी शतक पूर्ण केलं. चेन्नईच्या मैदानावरील हे त्याचं पहिलंच शतक ठरलं.
भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा वेळोवेळी समाचार घेत त्याने अर्धशतक लगावले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक ठरले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यात रोहित शर्माने दमदार शतक ठोकलं.
रोहितने १३० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं. घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरं स्थान पटकावलं. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ इतकी आहेत. तर यादीत वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली ७७.६च्या सरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितला चांगली सुरूवात मिळूनही त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणं शक्य होत नव्हते. पण दुसऱ्या कसोटीत त्याने शतकी मजल मारली.







