मुंबई, दि. १४ – करोना रुग्णांची संख्या कमी झाली म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने काही प्रमाणात नागरिकांना नियमांचे पालन करुन विविध बाबतीत सुट दिली. मात्र आता रुग्णसंख्येचा आलेख या आठवड्यात उंचावताना पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभराततीन हजार ६७० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २ हजार ४२२ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून तर दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत ५९९ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात करोनामुळे ७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दर आठवड्याला करोना रुग्णांच्या संख्येत हजाराच्या पटीत वाढ होणाऱ्या जिल्ह्यामध्ये मुंबईसह, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले नव्हते किंवा प्रमाण कमी होते. अशा जिल्ह्यात आता करोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश राज्य सरकारच्या वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.







