पुणे, दि.१४ – २२ वर्षाची पूजा चव्हाण अल्पावधीतच राजकारणात आली आणि जीवाला मुकली असेचं म्हणावे लागेल. पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा या तरुणीने रविवारी ( ७ फेब्रुवारी ) आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर ‘टिक टॉक स्टार’ अशी पूजाची ओळख होती. राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची मालिका संपत नाही तोपर्यत विदर्भातील आणखी एका मंत्र्याचे नाव पूजा आत्महत्या प्रकरणात समोर आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं आहे. या आत्महत्येला राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर संजय राठोड यांचा मोबाईल बंद असल्याचे दिसून येत आहे. मात्र पूजाच्या घरच्यांनी संजय राठोड यांचे नाव घेतलेले नाही. तर दुसरीकडे शिवसेनेने संजय राठोड यांना माध्यमासोबत बोलण्यास मनाई केली आहे. मात्र राठोड सध्या कुठे आहेत याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून याबाबत पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडून माहिती घेण्यात आली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
पूजाला दोन वर्षापासून सोरायसीसचा आजार होता. आजारामुळे ती तणावात होती, असं शरद राठोड यांनी सांगितले आहे. शरद राठोड हे पूजाचे भाऊजी आहेत. मूळची परळीची असलेली पूजा ही शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. आई-बापाला ती मुलासारखीच होती. सगळं घर तिच्यावर अवलंबून होते. तिला शालेय जीवनापासून समाज सेवेची आवड होती. पूजा ही प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची समर्थक होती. डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजाचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल पोलीसांना प्राप्त झाला आहे.
आघाडी सरकरामधील एका पाठोपाठ एका मंत्र्यावर आत्महत्या, बलात्काराचे आरोप लागत आहे. मात्र राज्य सरकार या प्रकरणी गंभीर असल्याचे दिसून येत नाही. कधी राष्ट्रवादीचा मंत्री तर कधी शिवसेनेच्या मंत्र्यावर गंभीर आरोप होवून सुद्धा आघाडी सरकार मुग गिळून गप्प बसलेले पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये सुद्धा एकवाक्यता दिसून येत नाही. चंद्रकांत दादा पाटील यांनी याप्रकरणी सुरेश राठोड यांचे नाव घेणे टाळले आहे.







