शहाजहांपूर (उत्तर प्रदेश) – क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. उत्तर प्रदेशात आईसोबत झालेल्या भांडणाचा राग आल्याने बहिणींनी आत्महत्या केली आहे. घरात असलेली आर्थिक चणचण हे वादाचं कारण होतं असं पोलिसांनी म्हटलं आहे. या बहिणींनी विष पिऊन आपले जीवन संपवल्याचे पोलीस तपासात कळाले आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये या बहिणी त्यांच्या कुटुंबासोबत राहात होत्या. घरची परिस्थिती बिकट असल्याने घरात सतत वाद होत होते. बुधवारी दुपारी बहिणींचे आईसोबत भांडण झाले होते. आई रागावून त्यांना फडाफडा बोलली, ज्याचा राग आल्याने दोघींनी विष पिऊन आत्महत्या केली. निशा आणि गुलफशा अशी या मुलींची नावे आहेत. विष प्यायल्यानंतर दोघीजणी तडफडायला लागल्या होत्या. त्यांना या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांची आई घाबरली होती आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आसपासची लोकं त्यांच्या घरात जमा झाली, तेव्हा या दोघी आम्हाला जगायचे नाही असं म्हणत होत्या असं पोलिसांनी सांगितलं आहे.
या दोघींना सीएसएच रुग्णालयात नेण्यात आले. तिथे नेल्यावर डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. मृत बहिणींना तीन भाऊ असून त्यातले दोघेजण मजुरी करतात. एक भाऊ हा दुबईमध्ये कामाला आहे. या घरातील सातपैकी पाच बहिणींची लग्न झाली होती. निशा आणि गुलफशा अविवाहीत होत्या. दीड वर्षांपूर्वी या दोघींच्या वडिलांचे निधन झाले होते आणि घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. पोलिसांनी या दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अधिक तपास सुरु आहे.







