ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वाहतूक पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्याचा प्रकार पुन्हा एकदा पहायला मिळाला. हा प्रकार कल्याणच्या वाहतूक नियंत्रण पोलिस कार्यालयात घडला. धक्कादायक बाब म्हणजे उन्मत्त वाहनचालक दारूच्या नशेत बेधुंद होता. त्याला कारवाईसाठी वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणले असता या नशेबाजाने आधी कॉलर पकडून वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने वाहतूक कार्यालयातच अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर धिंगाणा घातला. त्यामुळे वाहतूक पोलिस दलात एकच खळबळ माजली.
याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात मुजोर वाहनचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. गोकुळ पदघन असे अटक केलेल्या नशेबाज चालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्याणच्या वाहतूक नियंत्रण पोलिसांची कल्याण पश्चिम परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान टेम्पो चालक गोकुळ हा दारूच्या नशेत धुंद असल्याचे आढळून आले. दारू ढोसून वाहन चालविणाऱ्या गोकुळला वाहतूक पोलिसांनी रोखले. त्यांनतर त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी लगतच असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले.
दारूच्या नशेत झिंगलेल्या टेम्पो चालक गोकुळने चक्क वाहतूक पोलिस कर्मचारी प्रकाश जाधव यांची कॉलर पकडली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीही केली. आपल्या सहकाऱ्याला होत असलेल्या धक्काबुक्कीचा प्रकार पाहून इतर पोलिसांनी तत्काळ मद्यधुंद गोकुळला जखडले. त्याला अशाच अवस्थेत शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयात आणले. या कार्यालयात देखील त्याने धिंगाणा घालला. उपस्थित वाहतूक पोलिसांना लाखोली वाहिली. पोलिसांच्या अंगावर तो धावला. हा सर्व प्रकार कुणाच्यातरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात मद्यपी वाहनचालक गोकुळ पदघन याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुरुवारी दुपारच्या सुमारास कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे कल्याण शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी सांगितले.






