लहान मुलांची गँग पोलिसांच्या ताब्यात, एका मोबाइल चोरीचे 500 रुपये

गाझियाबाद – मोबाइल चोरांचा शहरांमध्ये अक्षरश सुळसुळाट झाला आहे. मात्र आता मोबाइल चोरांबाबत अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबाद इथली ही घटना आहे.

गाझियाबादच्या इंदिरापुरम ठाण्याच्या पोलिसांनी गुरुवारी मोबाईल चोरी गँगला ताब्यात घेतलं. ही गॅंग लहान मुलांच्या  माध्यमातून मोबाईल चोरी करायची. एका लहान वयाच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून नऊ मोबाईल, चार चाकू आणि एक ऑटो पोलिसांनी जप्त केला आहे. या लहान मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना अभयखंड इथल्या शनी मंदिराजवळून रात्री ताब्यात घेतलं. यातला ऑटो चालक देवेन्द्र कुमार मूळचा बिहारमधील सहरसा इथला राहणारा आहे. हा देवेन्द्र आपला भाऊ प्रवीण कुमारसोबत मिळून दिल्ली-एनसीआरच्या गर्दीच्या ठिकाणांवर लहान मुलांकडून मोबाईल चोरी करवत असे. एक मोबाईल चोरी केल्यावर तो मुलाला पाचशे रुपये द्यायचा.

पोलिसांच्या चौकशीत आरोपी देवेन्द्र म्हणाला, तो लक्ष्मीनगर इथून लहान मुलांना ऑटोमधून एनसीआरला नेत असे. गर्दीचा फायदा घेत मुलं मोबाईल चोरायची. लहान मुलगा मोबाईल चोरल्यावर लगेच यांच्यापैकी कुणाला द्यायचा. कधी ही लहान मुलं पकडली गेल्यावर आरोपीच मध्यस्थी करत त्यांना सोडून द्यायला सांगायचे. पोलीस म्हणाले, की आरोपी बिहार आणि झारखंड इथून लहान मुलांना शहरात जाऊन पैसे कमावता येतील असं अमिष देत आणायचे. लहान मुलंही आपल्या घरच्यांना याबाबत काही सांगायचे नाही. देवेन्द्र, प्रवीण, विक्की महतो, चुन्नू खां आणि एका लहान मुलाला पकडण्यात आलं आहे. इतर लोकांचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here