लखनऊ – उत्तर प्रदेश सरकारने २०२१-२२ सालचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्यातील २४ कोटी जनतेच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. लोकांचा विकास साधणारा, कल्याण करणारा आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर उत्तर प्रदेशचे स्वप्न पूर्ण करणारा आहे.
राज्यातील प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी, प्रत्येक घरात वीज, प्रत्येक गावात रस्ते, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणी आणि प्रत्येक हाताला काम मिळणार आहे. राज्यातील प्रत्येक गाव डिजिटल बनवण्याचा संकल्प पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचे योगींनी सांगितले आहे. संस्कृत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्यासोबत त्याच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था सरकार करणार आहे.
हा अर्थसंकल्प सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास संपादन करणार आहे. कोविडच्या काळात हा अर्थसंकल्प सादर झाल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात पहिले राज्य आहे जिथे पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. प्रत्येक गावांमध्ये कॉमन सर्विस सेंटर, ग्राम सचिवालय तयार करण्यात येणार आहेत. सर्व गावे बँकेसोबत जोडली जाणार आहेत. असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.






