वर्धा (कार्यालय प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यातील गुरुवाणी लेआऊट वाघापूर येथे राहणाऱ्या ४ मित्रमैत्रीणींचे अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करुन लुटल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर मुलींचा विनयभंगही करण्यात आल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले आहे. अवधुतवाडी पोलीसांनी चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुरुवाणी लेआऊट वाघापूर येथे राहणारा आणि ११ वी सायन्सचा विद्यार्थी असलेला आपल्या कोचिंग क्लासला जाण्यासाठी एक मित्र आणि दोन मैत्रीणींसह लोहारा एमआयडीसी परिसरात रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी चार अज्ञात इसम दुचाकीवरुन तिथे आले आणि त्यांनी या चौघांना लाकडीच्या काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. तर दोन मुलींना झुडपात नेवून त्यांची छेडछाड करण्यास सुरवात केली. मात्र या चौघांचे काही ओळखीचे मित्र इथे आले आणि त्यांनी यांची सुखरुप सुटका केली.
या अज्ञात आरोपींनी चौघांचे मोबाईलसह ३५ हजारांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला आहे. या घटनेची गंभीर दखल अवधूत पोलीसांनी घेतली असून अज्ञातांचा शोध सुरु असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी बुलंद पोलीस टाईम्स शी बोलताना सांगितले आहे.






